टायगर अभी जिंदा है !

chopada

शाम जाधव (पत्रकार) (अध्यक्ष -प्रेरणा दर्पण फाऊंडेशन चोपडा) – ..रात्री १० वाजता चोपडा शहर बंद म्हणजे बंदहा अलिखित नियम होता,तो शहरवासीयांनीही
मान्य केला होता,सर्व दुकाने (अत्यावश्यक सेवा सोडून) बाजारपेठ,पानटपऱ्या,दारूगुत्ते,परमिट रूम,बिअरबार,हॉटेल्स,सार काही बंद.यामुळे लोकांनी महिलांनी,सुटकेचा निःश्वास सोडला होता कारण नवरा घरी वेळेवर हजर….मुलगा दहाच्या आत घरी..मुली आपापल्या घरी..बेवडे बावडे रस्त्यावर नाही..महिला सुरक्षित..चोऱ्या नाही..तंटे नाही.. भांडणे नाहीत..की काही नाही.म्हणजे अगदी कसे तर ‘सोजा बेटा नही तो गब्बरसिंग आ जायेगा’ असाच टेरर , किर्रर्रर्र शुकशुकाट…
मला आजही आठवते चोपडा-वेले रस्त्यावरील एक हॉटेल जे आपल्याच विश्वात असायचे,रात्री साधारण साडेदहा वाजले असतील.हॉटेलवर पूर्ण रश सारे टेबल अगदी फुल्ल तेव्हढ्यात तो एक इसम काऊंटरवर आला,मळलेले कपडे गळ्यात गमछा,डोक्यावर चुरगळलेली गांधी टोपी,मापात न बसणारा कमरेतला पायजमा,
तो म्हणाला..’भाऊ दारू भेटी का’?मॅनेजर…(आपल्याच मस्तीत)आठे दारू नई ते मंग काय दूध भेटी?मॅनेजरचा खेकसणारा चेहरा बघून तो खेडूत थोडा दचकून बोलला ‘तसं नही हो आठे पोलीस अधिकारी भलता कडक येल शे म्हने’
(मॅनेजर पुन्हा नुस्त्या दारूच्या वासात गगनात पोचलेला)कसाना सायेब नी कसाना काय?तुमी
बोला कोनती लेतस!रातले बारा लोंग आठे दारु भेटी.त्यानंतर त्या खेडूत माणसाने जो धो-धो
धुतला,हॉटेलच्या सगळ्या टेबलवर त्या मॅनेजरला फिरवला प्रत्येक टेबलवर सूचना दिली,काय खायचे ते खा पण आज बिल द्यायचे नाही. या हॉटेल ला आज नियम कायदा मोडल्या बद्दल हाच दंड आहे.तो मळकट वेष भूषा केलेला माणूस,कधी रात्रीअपरात्री पायी कधी भल्या पहाटे चार वाजेला सायकलवर तर
कधी एखादया अनोळखी माणसाच्या खांद्यावर हात टाकून बिनधास्त गप्पा मारतांना चोपडा शहर वासीयांनी बघितला.कधी ओळखले कधी अनोळखी असा सस्पेंस भूमिका बजावणारा तो
व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून ते होते …मंगलसिंग सूर्यवंशी.नाम तो सुना होगा ! हो .. अगदी असाच सिन असायचा जेंव्हा चोपड्यात श्री मंगलसिंग साहेब पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावत होते. जवळपास सहा फूट ऊंची,भारदस्त शरीरयष्टी दमदार आणि करारा आवाज, बेरकी पण लक्ष भेदणारी नजर,खोचक आणि खान्देशी बोली म्हणजे समोर साहेब उभे आहे म्हटल्यावर भल्या भल्या गुन्हेगारांचे अवसान गळून पडावे
असाच रूबाब,तसाच दरारा आणि तो ही वर्दीला शोभणारा.मित्रांसाठी जीव की प्राण..पण जर का कायदा मोडला किंवा हातात घेतला मग तुमचा जीव आणि तुमचा प्राण काही खरे नाही!मंगलसिंग साहेबांनी आजवर जेवढेही पोलीस स्टेशन केलेत त्यांची स्टाईल सबसे हटके अशीच होती, क्याबिन,एसी,राउंड चेअर,टेबल त्यावर स्वच्छ काच,बाजूला एखादा फ्लॉवर पॉट,मंद-मंद असा रूम फ्रेशनरचा मनमोहक सुगंध,बेल मारताच कर्तव्य बजावण्यासाठी हजर असलेला कर्मचारी असा सारा अधिकार असूनही ते कधीच पोलीस स्टेशनच्या क्याबिन मध्ये स्थिरावले नाही,नव्हे रमले नाहीत, ते मंगलसिंग साहेब…त्यांना आम्ही मित्र मंडळी आदराने अण्णा म्हणतो,पोलीस स्टेशन कोणतेही असो कितीही भारी असो, लहान असो वा मोठे अण्णा कधीच दिखाऊ पणात गुरफटले नाहीत,पोलीस स्टेशनच्या आवारात खुल्या नभाखाली एक टेबल एक खुर्ची,बस्स..तिथेच न्याय निवाडा सुरू.गरीबाला सतवायचं नाही पिळायचं नाहीआणि दोषी गुन्हेगाराला काहीही झालं तरी सोडायचं नाही हाच अण्णांचा नियम आणि हीच कामाची पद्धत.पोलीस दलाचं ब्रीदवाक्य आहे’सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ म्हणजे चांगल्या प्रवृत्तीचे संरक्षण आणि वाईट वीचारांचे पतन
हे अण्णांनी शेवट पर्यंत जोपासले.
मी पत्रकारीता करीत असतांना बहुधा मी दैनिक पुण्य नगरीला ला असेन त्याकाळात अण्णा चोपडा येथे अपघाताने (अचानक)रुजू झाले आता पत्रकारीता विषय निघाला म्हणून नमूद करावेसे वाटते,तेव्हाची पत्रकारीता आणि आजची पत्रकारीता यात खूप बदल झाला आहे .आज नुसतं बिजनेस साठी राब-राब राबणारे धेंड त्यांना वरून उगारलेला चाबूक, लिखाण नको,संस्कृती नको,की भाषा नको,ही अवस्था फक्त पत्रकारांचीच आहे असेही नाही,पेपरच्या कार्यालयात कामं करणारी उप संपादक असोत नाही तर संपादक,ताटा खालचे मांजर होऊन गप गूमान जे मिळतंय ते गिळा गुर्र गुर्र केलं की तुमच्या पार्श्वभागावर शेठजीने लाथ हाणलीच समजा.कुठं काय ताळमेळ नाही,क्वालिटी नाही
आपली खुर्ची सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याच सहकारी कर्मचारी वर्गाच्या पाठीत खंजीर खुपसणे हे दुष्टचक्र चालले आहे. वर्तमान पत्रा च्या मालकाला ७५% आणि आपल्याला २५%
यासाठी आपल्याच परिचित माणसांचा १००%खिसा कापायचा?ते ही जाहिरातींच्या नावावर आता त्यातही दम राहीला नाही.वरून ऑफिस
मधे बसलेला ज्याला कौडीची अक्कल नाही तो आपल्याला शहाणपणाचे धडे देतो.त्यामुळे नको ते क्षेत्र, म्हणून गेल्या काही काळा पासून मी मुक्त हस्त पत्रकारीता स्वीकारली आहे. छंद आहे आवड आहे पात्रता आहे म्हणून लिहायचे.असो…हा विषय पुन्हा कधीतरी…
मंगलसिंग साहेब चोपडा आले त्याच काळात मी सुदैवाने व माझ्या जेष्ट पत्रकार मित्राच्या मदतीने पत्रकार संघाचा अध्यक्ष झालो.माझ्या नम्रपणाच्या सवयी नुसार पो.स्टे. ला गेलो अण्णांना चरणस्पर्श केला.(आजही करतो)मग म्हणालो अण्णा मी पत्रकार संघाचा अध्यक्ष झालो आपला आशिर्वाद घ्यायला आलो आहे.(तेंव्हा माझा जास्त परीचय नव्हता)अण्णांनी आपल्या भेदक नजरेनं माझ्याकडं थोडं पाहिलं
आणि म्हणाले ‘शामभाऊ चोपड्यात किती पत्रकार असतील’?, या प्रश्नांने मी थोडा गोंधळलो कसं-बसं उत्तर दिलं ‘अण्णा चोपडा तालुका मिळून असतील २०-२५’ ,अण्णांनी खिशात हात घातला पैशांचं बंडल काढत म्हणले कालच माझा पगार झाला आहे,त्यातले हे काही पैसे आहेत सगळ्या पत्रकारांना घेऊन एखाद्या हॉटेल ला जा, आनंद साजरा करा आणि हो खाली गांधी चौकात फटाक्याची लड लावा मला इथं आवाज आला पाहिजे.पैसे कमी पडले तर कोणत्या हॉटेल ला बसलेत मला फक्त फोन करा लगेच पाठवतो यात खाणे अथवा खाऊ घालणे हा विषय नाही, पण एखाद्या कर्मठ अधिकार्याने माझ्या सारख्या क्षुल्लक पत्रकारासाठी इतके प्रेम,इतकी आपुलकी,इतका जिव्हाळा दाखवावा याचं मला नवल वाटलं.पत्रकारीता करतांना मुरत गेलो,बऱ्याच पोलीस अधिकाऱ्याच्या जवळ पोचलो तेंव्हा काही गोष्टी लक्षात आल्या,ज्याचा जीव सदा ‘ओलीस’ तो ‘पोलीस’ त्यांना घर,दार,परिवार,नाते,समंध,असतांना आपल्यासाठी सारं वाऱ्यावर सोडतात,ते आपल्यातच परिवार बघत असावेत, किंबहुना त्यांना माझ्यात त्यांचा मुलगा दिसला असावा हा माझा गोड समज उराशी बाळगून त्या दिवशी मी मार्गस्थ झालो.तेच प्रेम साहेबांचे आजही कायम आहे.साहेबांनी आजवर,दोंडाईचा,मोहाडी,पिंपळनेर,शिंदखेडा,शिरपूर,आझादनगर,धुळे,नंदूरबार(शहर,तालुका,एलसीबी),पारोळा,चोपडा,सिन्नर
मालेगाव(आझादनगर)असे अनेक पोलीस स्टेशनला कर्तव्य बजावले.प्रत्येक ठिकाणी तेच
नाव..तोच दरारा..सिंग ईज किंग..आपल्या कामाच्या पद्धतीमुळे त्यांना एकवेळ जीवावर बेतले, पण त्यांनी माघार घेतली नाही,स्वभाव बदलला नाही.फक्त कधीतरी सिंहावलोकन करायचे आणि आपली कर्तव्ये पार पाडायचे !
वाघासारख्या या माणसाला लहान मुलागत ढसा-ढसा रडतांना मी बघितलंय साहेबांच्या मुलाचे रेल्वे प्रवासा दरम्यान काही वर्षांपूर्वी अपघाती दुःखद निधन झाले होते ,डोक्या बरोबरीचा मुलगा अचानक काहीही चूक नसतांना,हातातून वाळू बेमालूम पणे निघावी तसा निघून गेला होता.साहेब त्या कटू प्रसंगी कलाली या आपल्या गावी आले होते,त्यांचे सांत्वन करण्यासाठी चोपडा येथून त्यावेळचे आमदार जगदिशभाऊ वळवी,मी आणि मित्र लतीश जैन आम्ही पोचलो…साहेबांसमोर मी खाली मान घालून बसलो,काही सेकंदात त्यांचा बांध फुटला बराच वेळ वाघाचं काळीज असणारा हा धिप्पाड माणूस माझ्या खांद्यावर डोकं ठेवून ओक्साबोक्सी रडत होता.त्या काही सेकंदात एक विचार मनाला चाटून गेला,मी पत्रकार तसं बघितलं तर काहीच नाही, पण तरीही मला किती अभिमान मी स्वतःला फार पराक्रमी समजतो,माझ्या पेक्षा साहेब सर्वच बाबतीत श्रेष्ठ, ताकतवर,त्यांच्या हातात अमर्याद अधिकार,शक्ती.तरीही नियतीच्या आणि भगवंताच्या मर्जी पुढे कुणाचे काहीच चालत नाही. माझा अहंकार त्याच क्षणी साहेबांच्या अश्रूंसोबत गळून पडला होता.कालांतराने त्या दुःखद घटनेचे पान पालटून मनावर दगड ठेवून साहेबांनी पुन्हा समाजाच्या सेवेचे व्रत हाती घेतले.साहेब नाशिक येथे ट्रॅफिकला असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस(ACP)असतांना ३१ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाले.त्यांनी आपल्या पोलीस व्हॅन मधून आपल्या सहकारी मित्रांना उद्देशून केलेले वायरलेस वरचे शेवटचे संभाषण आणि भावुक झालेले साहेब बऱ्याच जणांनी सोशल मिडियावर बघितले.काही मिनिटात सेवानिवृत्ती….. आणि त्याच काही सेकंदात जन्मदिवस असा योगायोग त्यादिवशी होता,म्हणजे सेवानिवृत्तचे समाधान की वाढ दिवसाचा आनंद काय साजरा करावा हा पेच प्रसंग!अनेक अनुभव उराशी बाळगून आज साहेब सेवेतून निवृत्त झाले असले तरी,त्यांच्या
कर्मचाऱ्यांच्या, माझ्या सारख्या हजारो-लाखो लोकांच्या हृदयात कायम राहतील.शेवटी हेच सांगेन ……… टायगर अभी जिंदा है !

chopada

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here