तिड्या, अंधारमळी,मोहमांडी,निमड्या, गारखेडा ह्या आदिवासी गावांतील रस्ते फोडताहेत टाहो
रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – रावेर तालुक्यातील सातपुडा जंगलात असलेले आदिवासी गावे तिड्या अंधारमळी,मोहमांडी,निमड्या गारखेडा या गावातील अत्यंत दुरावस्था झाली असून, ह्या रस्त्यावरून वाहन घेऊन जाणे खूप जिकीरीचे झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यात वाहून गेल्याने परिसरातील जनतेला रस्त्याअभावी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यांना कोण जीवनदान देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
परिसरातील राहिवाश्यांना दवाखाना, शासकीय कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. त्यासाठी जीव हातावर घेऊन प्रवास करावा लागतो. तिड्या, मोहमांडी, अंधारमळी, निमड्या, गारखेडा रस्त्याची दयनीय अवस्थेकडे संबधित अधिकारी, पदाधिकारी यांना माहिती असूनही ते याकडे जाणीवपुर्वक डोळे झाक करीत असल्याचे संबधित गावांच्या ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. त्यांच्या या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल संबधित गावांच्या नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
या रस्त्यांची गेल्या तीन वर्षापासुन अतिशय दुरावस्था झाली असून हे रस्ते अपघातांना कारणीभुत ठरत आहेत. ह्या रस्त्याने प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. रस्त्यांची इतकी दुरावस्था झाली आहे की, नेमका रस्ता कोणता? आणि प्रवास करायचा तर कुठून करायचा? अशी परिस्थितीत आहे. कारण नेमका खड्यांत रस्ता आहे का, रस्त्यात खड्डा हेच समजत नाही. तरीही स्वतःचा जीव धोक्यात घालून नाईलाजाने वाहनधारक, प्रवाशी, गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी दवाखाना कामी ये जा करीत असतात. रस्त्याच्या दुरावस्थेने दवाखान्यात पोहचण्यास वेळ लागत असल्याने, काही महिलांची बाळंतपणे या रस्त्यातच झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचा या रस्त्यांकडे दुर्लक्ष करण्याचा भोंगळ कारभार कुठवर चालणार? असा सवाल आदिवासीने जनतेने उपस्थित केलाय? कारण या सातपुडा जंगलातील ग्रामीण जंगलमय परिसरात नेहमी काही ना काही घटना घडतच असतात. आजुबाजुला सगळीकडे जंगल असल्याने या जंगलातील हिंस्त्र प्राण्यांपासून देखील या परिसरातील जनतेच्या जीवाला धोका असतो. अर्थातच इकडे आड,तिकडे विहीर अशी परिस्थिती या रस्त्यांमुळे परिसरातील राहिवाश्यांबाबतीत निर्माण झाली आहे.
बुलंद टाइम्सचे प्रतिनिधी हमीद तडवी यांनी या रस्त्यांना भेट देवून रस्त्यांच्या दुर्दशेची पाहणी केली. या आदिवासी गावांतील तडवी भिल्ल,पावरा,भिलाला ह्या आदिवासी लोकांची भेट घेऊन संबधित तिड्या,अंधारमळी,मोहमांडी निमड्या,गारखेडा या रस्त्यांच्या दुर्दशेबाबत विचारपुस केली असता,तुम्ही या अतिशय दयनीय अवस्था झालेल्या रस्त्याने प्रवास कसा करतात? खड्यांनी बहरलेल्या ह्या रोडने प्रवास करतांना कस वाटते?,यावर ह्या पाच ते सहा गावांच्या नागरिकांनी पञकारांना उत्तर दिले की,संबधित विभागाच्या अधिकारी, पदाधिकारी यांचेकडुन उडवाउडवीची उत्तरे दिली जातात,आदिवासी भाग असल्यामुळे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नाईलाजाने आहे त्या मार्गाने आम्हांला जावे लागते.
संबधित विभागाचे, अधिकारी, पदाधिकारी हे जाणीवपुर्वक ह्या रस्त्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे परिसरातील नागरिकांकडून बोलले जात आहे. तरी या रस्त्यांच्या दुर्दशेकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन, संबधित गावांच्या रस्त्यांचे त्वरीत डांबरीकरण करावे, अशी मागणी तिड्या, अंधारमळी, मोहमांडी, निमड्या, गारखेडा परिसरातील नागरिकांकडून होत आहे.








