‘पाठांतराचे संस्कार’ या विषयावर २ दिवसीय वेबिनार चा समारोप
पुणे (उपसंपादक अमोल सोळंके) – ‘गणित हे मार्कांसाठी,हिशेबासाठी आहे,ही भावना मनातून काढली पाहिजे. गणिती बुद्धी आणि गणिती वृत्ती आयुष्यात निर्माण होणे हे अधिक महत्वाचे आहे. असे संस्कार नकळत केले तर ते रुजतील,संस्कार लादता कामा नये,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांनी केले.
८ ऑक्टोबर २०२०, रविवारी सकाळी ११ वाजता इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजीकल हेल्थचे संस्थापक डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ‘पाठांतराचे संस्कार’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते. डॉ नाडकर्णी म्हणाले,’संस्काराचे बोध होणे हे महत्वाचे आहे.मुलांना त्यांचा स्वतःला समजलेला बोध घेऊ द्या. भाव समजून घेऊ द्या.आपण वर्तनावर फार भर देतो.त्यामुळे त्याची कवायत होते.वर्तनात भाव राहिला तर बोध होतो आणि संस्कार रुजतात.गणिताचे,पाठांतराचे संस्कार करताना ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे’.
‘गणित हा विषय आपल्याला कार्यकारण भाव,लॉजिक शिकवत असतो.आयुष्यातील गणित सोडवितानाही आपण ताळा करून पाहिला पाहिजे. दुसऱ्या पद्धतीने तेच उत्तर येत का, हे तपासून पाहिले पाहिजे.हिशेबापुरते,मार्कांपुरते गणित मर्यादित देवू नये,गणिती बुद्धी आणि गणिती वृत्ती आपल्या जीवनात आली पाहिजे,असेही डॉ नाडकर्णी यांनी सांगितले.
गणिताची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यात आलेल्या ‘अंकनाद’ या ऍप तर्फे ‘पाठांतराचे संस्कार’ या विषयावर २ दिवसीय विनामूल्य वेबिनार आयोजित करण्यात आला होता.शनिवार,७ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता ‘अंकनाद’ऍप चे प्रणेते मंदार नामजोशी यांनी ‘संगीतबद्ध पाढे पाठांतर प्रणाली’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्राची साठे यांनी सूत्रसंचालन केले.पराग गाडगीळ,समीर बापट,निर्मिती नामजोशी इत्यादी सहभागी झाले.







