हैदराबाद – ट्रॅफिक पोलिस हा तसा एखाद्या चौकात किंवा रस्त्यावर वाहतूकीचं नियोजन करत असलेला माणूस. रस्त्यावर वाहतूक विस्कळीत होऊ नये आणि ट्रॅफिक जाम होऊ नये यासाठी कार्य करत असतो. आता अशाच एका ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपलं कर्तव्य बजावत असलेल्या या ट्रॅफिक पोलिसावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
हैदराबादमधील असलेल्या या व्हिडिओमध्ये ट्रॅफिक पोलिसाने एका अॅम्ब्युलन्सला गर्दीतून वाट करून देण्यासाठी अॅम्ब्युलन्सच्या पुढे धावत जाऊन आडव्या असलेल्या गाड्यांना बाजूला होण्यासाठी विनंती केली.
अबिड्स इथून कोटीला निघालेल्या अॅम्ब्युलन्समधील रुग्णाची परिस्थिती गंभीर होती. अॅम्ब्युलन्स जेव्हा ट्राफइकमध्ये अडकली तेव्हा वाहतूक नियंत्रण करणाऱ्या ट्राफिक पोलिसाने पुढे येत अॅम्ब्युलन्सला मार्ग करून दिला. यासाठी ट्राफिक पोलिस गाडीच्या पुढे धावत राहिला आणि वाटेत आडव्या असलेल्या गाडीचालकांना बाजूला होण्याची विनंती केली आणि अॅम्ब्युलन्ससाठी मार्ग मोकळा केला.
सोशल मीडियावरून या ट्राफिक पोलिसाच्या कामाचं कौतुक केलं जात आहे. अतिरिक्त आयुक्त अनिल कुमार यांनीही हा व्हिडिओ ट्विट केला आहे. यात पोलिसाचे कौतुक करताना त्यांनी म्हटलं की, हैदराबाद ट्राफिक पोलिस अधिकारी बाबजी अॅम्ब्युलन्ससाठी रस्ता रिकामा करताना. खूप छान. हैदराबाद ट्राफिक पोलिस नागरिकांच्या सेवेमध्ये अशा शब्दात त्यांनी ट्राफिक पोलिसाच्या कामाचं कौतुक केलं.






