मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी वादाच्या भोवर्यात अडकलेल्या रिपब्लिक वृत्तवाहिनेचे संपादक अर्णब गोस्वामींना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने अर्णब गोस्वामींना अलिबाग सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दखल करावा. त्यावर कनिष्ठ न्यायालयाने चार दिवसांत निर्णय घ्यावा, असे निर्देष दिले. यामुळे अर्णव गोस्वामींचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिस व रायगड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत बुधवारी अटक केली. नंतर त्यांना अलिबाग कोर्टात हजर करण्यात आले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याला आव्हान देत अर्णव गोस्वामींच्यावतीने मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाल्यानंतर राखून ठेवलेला निर्णय आज मंगळवारी जाहीर केला.
न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. आरोपीने नियमाप्रमाणे सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज करावा. जामीन अर्ज दाखल केल्यानंतर सत्र न्यायालयाने चार दिवसांत जामिनावर निकाल द्यावा, असे निर्देश हायकोर्टाने दिले.







