सांगली (स्वप्नील कारेकर) – तासगाव तालुक्यातील सावळज गावाला कोरोनाचे ग्रहण लागले आहे. या गावात एकाच दिवशी 3 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. तर अंजनी येथील एका 68 वर्षीय वृद्धाचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बधितांचा आकडा 24 वर पोहोचला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल सूर्यवंशी यांनी दिली.
लॉकडाऊन काळात सावळज या गावाने कडक शिस्त पाळली होती. कडेकोट बंद ठेवत तालुक्यात आदर्श निर्माण केला होता. गावात कोरोनाची एन्ट्री होऊ नये यासाठी प्रशासनाने अहोरात्र कष्ट घेतले. औषध फवारणीसह अन्य उपाययोजना करून आजपर्यंत गावाला कोरोनाची दृष्ट लागू दिली नव्हती.
30 जून रोजी मुंबईहून 4 जणांचे कुटुंब सावळज येथे आले होते. त्यांना गावात क्वारंटाईन करण्यात आले होते. या कुटुंबातील सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात आली. या सर्वांचे रिपोर्ट प्रलंबित होते. सर्वांचे रिपोर्ट काय येतात, याकडे सावळजकरांचे लक्ष लागून राहिले होते. गावकऱ्यांमध्ये धाकधूक होती. अखेर या कुटुंबातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तर एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.
गावात एकाच दिवशी कोरोनाचे 3 रुग्ण सापडल्याने गावात खळबळ उडाली. अनेक महिने गावात कडक उपाययोजना करूनही गावाला कोरोनाची ‘वक्रदृष्टी’ लागल्याने गावकऱ्यांनी घेतलेले कष्ट वाया गेल्याचे बोलले जात आहे. सावळजबरोबर अंजनी येथेही एका 68 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे. हा वृद्ध 29 जून रोजी पनवेल येथून आला आहे. वाघापूर कनेक्शनमधून बसलेल्या झटक्यातून तालुका अद्याप सावरला नाही तोपर्यंत सावळज व अंजनी येथून तालुक्याला हादरे बसले आहेत. दोन्ही गावात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दोन्ही ठिकाणी कंटेन्मेंट आणि बफर झोनची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
सावळज येथे जे कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत त्यांना कसलीच लक्षणे जाणवत नव्हती. मात्र तरीही आरोग्य विभागाने व गावातील काही युवकांनी पुढाकार घेऊन या कुटुंबातील 50 वर्षाच्या वरील लोकांचे स्त्राव तपासणीसाठी घेतले. त्यातूनच तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. जर आरोग्य विभागाने या लोकांचे स्त्राव तपासणीसाठी घेतले नसते तर कदाचित धोका वाढू शकला असता. त्यामुळे आरोग्य विभागाने दाखवलेल्या तत्परतेचे गावात कौतुक होत आहे







