सीके (CEQUE) विद्यार्थी आणि शिक्षण यांच्यातील दरी जुळविणारा आश्वासक दुवा

chque

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – कोविड महामारीमुळे शाळा बंद पडल्या आणि त्याचा परिणाम जगभरातील विद्यार्थ्यांवर झाला. असरच्या ताज्या अहवालानुसार, भारतात केवळ एक तृतीयांश मुले ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत आहेत आणि या ३२.५ % मुलांमधील काही अगदी थोडी मुले लाईव्ह ऑनलाईन क्लासला बसू शकत आहेत. या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचण्याच्या आणि त्यांच्यावर झालेल्या शिक्षणाच्या सकारात्मक परिणामाच्या अगदी मोजक्याच खुणा आढळून येत आहेत.

 

नुकत्याच प्रसिध्द झालेल्या युनिसेफच्या एका अहवालानुसार “भारतामध्ये १५ लाख शाळा बंद पडल्याचा पूर्वप्राथमिक ते माध्यमिक गटातील २८.६ करोड मुलांवर विपरीत परिणाम झाला आहे. (यामध्ये ४९% मुली आहेत). कोविड पूर्व काळात आधीपासूनच शाळाबाह्य असणाऱ्या ६० लाख मुला-मुलींमध्ये या २८.६ करोड मुलांची भर पडली आहे.” हा अहवाल पुढे असेही सांगतो, “भारतात इलेक्ट्रोनिक शिक्षणासाठी केवळ २४% कुटुंबांमध्येच इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत, शिवाय येथे शहरी-ग्रामीण आणि लिंगभाव यांची एक मोठी दरी आहे.

 

मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी महाराष्ट्रामध्ये शासनाकडून कठोर प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये ऑनलाईन शिक्षणासोबतच ‘दारोदारी शाळा’ या स्थानिक संकल्पनांचा अंतर्भाव आहे.
हे सारे जरी प्रशंसनीय असले तरीही आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे हे स्पष्ट आहे. अगदी अथक प्रयत्न करूनही शिक्षकांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. कनेक्टीव्हिटीच्या समस्यांमुळे ऑनलाईन वर्ग आणि त्यातील उपस्थिती खूपच क्वचित, थोडकी आणि बेभरवशाची असते. या पार्श्वभूमीवर सर्वच्या सर्व मुलांपर्यंत तातडीने पोहोचणे आणि त्यांचे सार्थ शिक्षण सुरु रहाणे हे आत्यंतिक गरजेचे ठरते. हे सुनिश्चित करण्यासाठी स्थानिक शिक्षण विभाग निरनिराळ्या मार्गांचा अवलंब करीत आहे.

 

मुंबई मधील सीके (CEQUE) ही NGO शासनाच्या या प्रयत्नांना मदत करीत आहे. सीके संस्थेतर्फे स्थानिक शिक्षण विभागांसोबत संयुक्तपणे नाशिक, पालघर, चंद्रपूर, गडचिरोली, मुंबई आणि ठाणे या ६ जिल्ह्यांतील प्राथमिक शाळेच्या सुमारे ५,५०० विद्यार्थ्यांना गणित व भाषा विषयाची शैक्षणिक संसाधने पुरवली गेली आहेत. केवळ इतकेच नाही तर गणित व भाषा विषयाच्या अभ्यासक्रमाशी निगडीत कार्यपुस्तिका स्वतः शिक्षकांनी एकत्र येऊन सी.के.च्या मार्गदर्शनाने व सहकार्याने तयार केल्या आहेत. रंगीत आकर्षक छपाई असलेल्या या कार्यपुस्तिकेत विविध कोडी, खेळ, क्रुती, प्रश्नोत्तरेअसून यासोबतच त्यांच्या शिक्षकांचे मार्गदर्शनही या वाडीवस्तीवरच्या मुलांना उपलब्ध होत आहे. शिक्षक ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमांद्वारे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया शेवटच्या मुलापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करीत आहे. दिवाळीच्या सुटीतील अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी या कार्यपुस्तिकेचा वापर करण्याची योजना शिक्षकांनी आखली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनविषयक संकल्पना अधिक स्पष्ट होण्यास व दृढीकरणासाठी नक्कीच मदत होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना आनंदायी शिक्षणाचा अनुभव दिवाळी सुट्टीतही घेता येत आहे.

 

या अभिनव उपक्रमास डीएसपी मेरिल लिंच, एचटी पारेख, जेएलएल या नामांकित उद्योग समूहांचे पाठबळ लाभले असून या उपक्रमाच्या सहाय्याने मुंबई सारख्या गजबजलेल्या ठिकाणापासून ते गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील अनेक विद्यार्थी आणि त्यांचे हक्काचे शिक्षण यातील भलीमोठी दरी कमी होण्यास हातभार लागला आहे….. शिक्षणगंगा खर्‍या अर्थाने घरोघरी पोहचवण्यासाठी सी.के.व त्यांच्या शिक्षकगटाने केलेल्या प्रयत्नांना यश येत आहे, अशी माहिती कार्यक्रम समन्वयक अवघडी घोडके यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here