- मागण्यांचे दिले निवेदन
- सर्व मागण्या त्वरीत सोडवणार असल्याचे आयुक्तांनी दिले आश्वासन
मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे नुतन कल्याण आयुक्त मा. रविराज इळवे यांचा मुंबई येथील कामगार कल्याण मंडळ कार्यालयात कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियम व प्रोटोकॉल पाळून पुर्व नियोजित सदिच्छा भेट घेऊन राज्य गुणवंत कामगार असोसिएशन स्थापनेचा हेतु,उद्देश व ध्येय धोरणे व गुणवंत कामगाराच्या मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा केल्यानंतर सर्व महत्वपूर्ण मागण्या त्वरीत सोडविणार असल्याचे नुतन कल्याण आयुक्तांनी आश्वासन दिल्यानंतर असो. चे अध्यक्ष सुरेश केसरकर सचिव स्वानंद राजपाठक उपाध्यक्ष दिलीप घोलप सहसचिव मुकुंद कोकणे, राज्य सदस्य केरबा डावरे, सोपान बांगर,गुलाबराव सोनावणे व मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे आदी च्या उपस्थितीत शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ तसेच मागण्याचे निवेदन देऊन गौरव केल्याचे प्रसिद्धी पत्राद्वारे कळविले आहे.
यावेळी नवनिर्वाचित कल्याण आयुक्त रविराज इळवे म्हणाले की, आपल्या राज्य गुणवंत कामगार असोसिएशनला कोणतेही राजकीय लेबल नसल्याचे पाहून कौतुक केले व मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा केली असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची स्थापना नुकतीच करण्यात आली असून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून कामगार कायदयाचे विश्लेषण व जाणीव जागृती कार्यक्रम गुगल मिटवर झूम अॅप च्या माध्यमातून चर्चासत्राचे आयोजन करून कार्यक्रमाचे सत्र सुरू केले आहे. कोरोना च्या काळात कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात ऑनलाईन गुगल मिटवर प्रत्येक क्षेत्रातील कामगार गुणवंत कामगार व त्याचे कुटुंबीय तसेच विद्यार्थी यांच्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण व प्रबोधनात्मक कार्यक्रम असोसिएशनच्या वतीने सुरू असल्याचेही असो.चे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सध्या सुरू असलेल्या विविध दीर्घकालीन योजना व उपक्रम यामुळे कामगार व कामगार कुटुंबीयांवर होणारा प्रतिकुल परिणाम याबाबत व्यापक चर्चा करण्यात आली असून नुतन कल्याण आयुक्तांनी राज्यातील सर्वच गुणवंत कामगारांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले त्यास असोसिएशनच्या वतीने सकारात्मक चर्चाद्वारे अनुकूलता दर्शविली .तसेच राज्यातील सर्व क्षेत्रातील कामगार व गुणवंत कामगार यांच्या हितासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे विविध मागण्याची निवेदन पाठवली होती. त्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच सोडविणार असल्याचे नुतन कल्याण आयुक्तांनी आश्वासन दिले असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.







