सदाभाऊंची राजू शेट्टींना साद, पण शेट्टींची नकारघंटा

sadabhau-khot-and-raju-shetty

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यातील हाडवैर सर्वांना माहित आहे. शेतकरी आंदोलनात कधी काळी ही जोडी खांद्याला खांदा लावून लढली. मात्र वैयक्तिक हेव्यादाव्यावरुन ही जोडी फुटली. आता पुन्हा सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांचा हात धरण्याचे संकेत दिले आहेत. राजकारणात कुणी कोणाचा शत्रू नसतो, असे सदाभाऊंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.

 

खोत यांनी म्हटले आहे की, आम्ही दोघे लुटारुंच्या विरोधात लढलो. मात्र आज जर राजू शेट्टी यांनी लुटारुंची संगत सोडली तर निश्चितपणाने त्यांना पुन्हा खांद्यावर घ्यायला सदाभाऊ खोत तयार आहे.राजू शेट्टी प्रस्थापितांच्या बाजूला गेले. यामुळे शेट्टी आणि माझ्यात दरी निर्माण झाली. शेट्टी प्रस्थापितांच्या नरड्यावर पाय देण्यासाठी रस्त्यावर उतरले तर राजू शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावेन, असे सदाभाऊ खोत यांनी पुढे नमूद केले.

 

दरम्यान, राजू शेट्टी यांनी सदाभाऊंना आता अस्तित्वाचा प्रश्न सतावत असल्याचे म्हटले आहे. गेली ३५ वर्षे मी चळवळीत काम करतो. ज्यांचे हात, चारित्र्य स्वच्छ त्यांच्यासोबत मी काम करतो. ज्यांना हाकललं त्यांना परत कसे घेऊ. स्वस्छ हात, स्वच्छ चारित्र्य हे आमचे निकष आहेत. त्यात सदाभाऊ कुठेही बसत नाहीत. खोत यांना पक्षात घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here