इस्लामाबाद- एका दिवसापूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महेमुद कुरेशी यांनी आपल्याला कोरोना झाल्याचं जाहीर केलं होतं. आता पाकिस्तानचे आरोग्यमंत्री जाफर मिर्झा यांचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली.
आरोग्यमंत्री जाफर मिर्झा यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. माझी कोविड-19 चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी स्व:ताला विलगीकरणात ठेवले आहे आणि आवश्यक ती काळजी घेत आहे कोरोनाविषाणूने पाकिस्तान पुरता बेजार झाला आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत तर आहेच, पण अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्यांच्यावर महत्वाची जबाबदारी आहे, अशा आरोग्यमंत्र्यांनाच कोरोनाची लागण झाली आहे.
पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील तीन केंद्रीय मंत्री कोरोनाग्रस्त झाले आहेत. या नेत्यांच्या संपर्कात आलेल्यांचा माग काढला जात असून त्यांची कोविड चाचणी घेतली जात आहे.पाकिस्तानमध्ये एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2,33,526 पर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत 1.3 लाख लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे, तर आतापर्यंत 4,800 जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.







