जळगाव शहरातील लॉकडाऊनकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडून सूचनावली जाहीर

जळगाव (निलेश पाटील) – शहर व महानगरपालिका क्षेत्र व अमळनेर नगरपालिका क्षेत्रात दि. ७ जुलै ते १३ जुलै या कालावधीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. या लॉकडाऊन कालावधीकरिता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सूचनावली जाहीर केली आहे.
या सूचनावलीनुसार, लॉकडाऊन कालावधीमध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालये उदा. संरक्षण, रेल्वे, आयकर व इतर विभाग सुरु राहिली. मात्र संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय ओळखपत्र वापरणे बंधनकारक आहे., न्यायालयीन कामकाज नियमितपणे सुरु राहिल, मात्र वकिलांना बार असोसिएशनचे ओळखपत्र सोबत बाळगावे लागेल. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयातील केवळ उत्तरपत्रिका तपासणी करणे, निकाल घोषित करणे आदी काम सुरु राहिल, माल वाहतुकीची सर्व व्यवस्था सुरु राहील, या कालावधीत उघड्यावर वा रस्त्यावर खाद्यपदार्थांची विक्री करता येणार नाही. पाण्याचे जार वितरीत करणारे, घरपोच गॅस सिलिंडरचा पुरवठा करणारे वितरक यांना ये जा करण्यास मुभा राहील. ज्या ठिकाणी सरकारी – खासगी बांधकाम सुरु आहे व ज्या ठिकाणी मजूरांची राहण्याची व्यवस्थाआहे अशा ठिकाणी बांधकामे सुरु ठेवता येतील. आत्मा योजनेतंर्गत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचे गट, उत्पादक कंपन्या अथवा उत्पादक शेतकरी यांना घरोघरी जाऊन भाजीपाला विक्री करण्याची मुभा असेल, मात्र याकरिता त्यांनी तालुका कृषी अधिकारी यांचेकडून परवानगी घेणे बंधनकारक राहील, टेलिफोन सेवा, इंटरनेट सेवा व केबल सेवा अबाधितपणे सुरु राहतील.
तरी वरील नियमावलीचे पालन करण्यासोबतच शहरातील नागरिकांनी घरातच रहावे व कोरोनाच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here