अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना महामारीमुळे बंद करण्यात आलेले जगप्रसिद्ध साईमंदिर दर्शनासाठी खुले करून आठ दिवस झाले असून काल रविवारी शिर्डीत भाविकांची अलोट गर्दी बघावयास मिळाली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता. दरम्यान आठ दिवसांत सुमारे पाऊण लाख भाविकांनी साईदर्शनाचा लाभ घेतला आहे तर एक लाखापेक्षा जास्त भाविकांनी शिर्डीत हजेरी लावली आहे.
सोमवार दि.16 नोव्हेंबरपासून ते शनिवार 21 पर्यंत शिर्डीत करोना रुग्णांची संख्या 30 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. साई संस्थानच्यावतीने गर्दी टाळा तसेच सोशल डिस्टन्सिंग, तोंडाला मास्क लावा असे वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे.मंदिर खुले केल्यानंतर पहिल्या रविवारी राज्यातील तसेच परराज्यातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी सशुल्क दर्शन रांगेत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवल्याचे चित्र बघावयास मिळाली.
साई मंदिरात प्रशासनाच्यावतीने भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी नियोजनबद्ध कामकाज सुरू असले तरी मंदिराबाहेरील दर्शन पासेससाठी भाविकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर ठेवत एकच गर्दी केली होती.विना मास्क न वापरणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शिर्डी येथे पत्रकार परिषदेत सांगितले होते. सव्वा लाख भाविकांच्या तुलनेत ही कारवाई खूपच कमी आहे. दंडाची रक्कम शंभर रुपये असल्याने ती सहजासहजी भरून भाविक मोकळे होतात हीच रक्कम दिल्लीप्रमाणे प्रतिव्यक्ती दोन हजार आकारली तर या ठिकाणी मास्क तसेच सोशल नेटवर्किंगचा नियमांचे पालन करणार्यांच्या संख्येत वाढ होईल असीम मत साईभक्तांनी तसेच ग्रामस्थांनी व्यक्त केले.







