३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?

Onion

नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव) – ‘तुमच्या शेतमालाला चांगले पैसे देतो’, असे म्हणून विश्वास संपादन करत देवळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याची एका तोतया व्यापाऱ्याने फसवणूक केल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे.

 

 

पोलिस प्रशासनाने मला न्याय मिळवून द्यावा. केवळ फोनवरील बोलण्यावर विश्वास ठेवून दोन पैसे मिळतील, या आशेने आम्ही एवढा माल घेऊन आलो होतो. परंतु, इतका गोड बोलणारा तो एवढा भामटा असेल आणि आमची फसवणूक करेल, असे वाटले नव्हते. यात मार्केटमधील मुन्ना ट्रेडिंग कंपनीवाल्याचाही हात असल्याचा संशय आहे.
-नानाजी साबळे, पीडित कांदा उत्पादक, देवळा

मटाणे (ता. देवळा) येथील कांदा उत्पादक शेतकरी नानाजी निंबा साबळे (वय ५८) हे इजियाज अन्सारी याच्या सांगण्यावरून बुधवारी (ता. १८) सायंकाळच्या सुमारास पिक-अप वाहनात २९ क्विंटल ४५ किलो (६० गोण्या) कांदा विक्रीसाठी नाशिकमध्ये आले होते. त्या वेळी संशयिताने पंचवटीतील मालेगाव स्टॅन्ड येथे त्यांच्याशी चर्चा करून विश्वास संपादन करत पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डात बोलावले. तेथे मुन्ना ट्रेडिंग कंपनीसमोर कांद्याबाबत दोघांमध्ये व्यवहार झाला. २७ रुपये किलो या दराने व्यवहार ठरल्यानंतरही संबंधिताने २० रुपये किलो या दरानेच ५८ हजार ५०० रुपये दिले जाईल, अशी हमी दिली. येथील एका गुदामात माल उतरविण्यात आला. बिलही बनविण्यात आले.

 

या वेळी साबळे यांनी मालाचे पैसे मागितले असता, हा संशयित साबळे यांच्या वाहनात बसला व पुन्हा मालेगाव स्टॅन्ड येथे त्यांना घेऊन आला. त्याठिकाणी साबळे दांपत्याला चहा पाजला. नंतर मोबाइलवर बोलायचे नाटक करून त्याने पळ काढला. साबळे यांनी त्याला फोन केला, मात्र त्याचा मोबाइल बंद लागल्याने साबळे यांनी पुन्हा मार्केटमध्ये धाव घेतली. मात्र तोपर्यंत मालही गायब होता. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साबळे यांनी रात्री उशिरा (ता. १९) पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेत संबंधित संशयितावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कासर्ले तपास करीत आहेत.

 

केंद्रसरकारने नुकतीच शेतीमाल विक्री संदर्भात सुलभता यावी यासाठी नियमन मुक्तिचा कायदा केला, त्यामुळे शेतकरी आपला शेतमाल देशाच्या कानाकोपऱ्यात कोठेही विकु शकतो परंतु शेवटी माल विकतांना शेतकऱ्याला त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष लिलाव अथवा भाव ठरवताना स्थानिक बाजारसमिती व तिथे सहभागी असलेले व्यापारी,दलाल हे शेतकऱ्यांना गोड बोलून लुटतात.त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांच्याकडील किंमती शेतमाल घेवून , पैसे देण्यास दिरंगाई करत टाळाटाळ करुन पोबारा करतात. भाजीपाला, कांदे, द्राक्ष, डाळिंब अशा अनेक नकदी पिकांच्या बाबतीत हे फसवणुकीचे प्रकार वांरवार घडत आहेत, याबाबतीत.पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघांवकर अतिशय संवेदनशील आहेत, अशा शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापारी व दलालांच्या मुसक्या आवळुन त्यांना.टाडा लावून जेरबंद केले पाहिजे
– कुबेर जाधव
संपर्कप्रमुख, राज्य कांदा उत्पादक संघटना नाशिक

तोतया व्यापाऱ्याने शेतकऱ्यास २९ क्विंटल ४५ किलो कांद्याची रक्कम न देता माल घेऊन फरारी झाला. यासंदर्भात पंचवटी पोलिस ठाण्यात संशयित इजियाज अन्सारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रतापराव दिघावकर यांच्याकडे साबळे यांनी आपली व्यथा मांडली. दिघावकर यांनी अनेक व्यापाऱ्यांना धडा शिकवत अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला, आपल्याच बागलाण तालुक्याचे भूमिपुत्र असल्याचे समजताच साबळे यांनी नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रतापराव दिघावकर यांच्याकडे न्याय मागण्यासाठी गेले. घडलेला प्रकार मांडत असताना अडखळत होते त्यावेळी ‘तुम्हाले अहिराणी येस का’ असे दिघावकर यांनी विचारले तेव्हा त्यांनी सर्व प्रकार अहिराणी भाषेत व्यथित केला. यांनतर पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांना दूरध्वनी करून पुढील तपास लवकरात लवकर करून शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी सूचना केली.

दिघावकर यांच्या भेटीनंतर साबळे चांगलेच भारावून गेले.एवढा मोठा अधिकारी आपल्याशी एवढ्या आपुलकीने आणि आपल्याच अहिराणी भाषेत बोलले याविषयी त्यांना आपुलकी वाटली आणि आपले कष्टाच्या कांद्याचे पैसे परत मिळतील, आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त
केला.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here