मुंबई (संपादक सुनिल पाटील) – मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 साली झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात पोलिस आणि जवान मिळून 18 जणांना वीरमरण आले होते. तसेच, 166 सामान्य नागरिकांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शहीदांना आदरांजली वाहिली. तसेच, हुतात्मा दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही शहीदांना आदरांजली वाहिली.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज २६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना प्राणार्पण केलेल्या शहीद पोलिसांच्या पवित्र स्मृतीस मुंबई पोलिस आयुक्तालय येथे पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. कोरोना संकटमामुळे यंदा शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी ठराविक लोकांनाच परवानगी देण्यात आली होती. यावेळी शहीद झालेल्या पोलिसांचे कुटुंबीयांनीही येथे येऊन श्रद्धांजलीही दिली. यादरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शहीदांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
“त्यांचे बलिदान कधीही विसरु शकणार नाहीत. आज आम्ही आमच्या तारणकर्त्यांना श्रद्धांजली वाहतो,” असे मुंबई पोलिसांनी ट्विट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ट्वीटरवरुन शहीदांना आदरांजली अर्पण केली. ‘मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या पोलीस व सुरक्षा दलातील सर्व शहीदांना विनम्र आदरांजली. या हल्ल्यात आपल्या जवळच्या व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांप्रती आज संवेदना व्यक्त करताना दहशतवादाविरोधातील आपला लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार करूया,’ असे ट्वीट पवारांनी केले.







