ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मनोज शेलार यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी उल्हासनगर महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण विकास विभागातील लिपिकाला गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. सचिन वानखेडे असे या लिपिकाचे नाव आहे. वानखेडेसह संतोष ऊर्फ पापा पगारे यालाही अटक करण्यात आली आहे. दोघांना २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या हल्ला प्रकरणात धर्मेश आणि नागेश असे दोन आरोपी फरारी आहेत. त्यांच्या मागावर गुन्हे शाखेची पथके आहेत. महापालिकेत विभागातील काही तक्रारींमुळे त्रास होईल, या भीतीपोटी बबली कांबळे नावाच्या व्यक्तीच्या मदतीने चार आरोपींकडून हल्ला केल्याची कबुली वानखेडे याने दिल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.
अंबरनाथच्या पूर्व भागातील गोविंद पूल परिसरात ८ ऑक्टोबर रोजी उल्हासनगर मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मनोज शेलार यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.
या हल्लय़ात शेलार बचावले असले तरी त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. या हल्लय़ाचा तपास सुरू होता. १५ दिवसांपूर्वी कल्याण दुर्गाडी परिसरातून चार आरोपींना अटक करण्यात आली होती. या वेळी गुन्ह्य़ात वापरलेली तलवार, दोन दुचाकी आणि मोबाइलही जप्त करण्यात आले होते. चारही आरोपी १८ ते २१ वयोगटातील असून आरोपींनी हल्लय़ाची कबुली दिली होती. हल्लय़ामागचे कारण शोधण्याचे काम गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होते.







