नवी दिल्ली – शेती सुधारणा कायद्याविरोधात पंजाबमधून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांना राजधानीत प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांना दिल्लीतील बुराडी येथील निरंकारी मैदानात आंदोलनास परवानगी देण्यात आली आहे. कोरोना संबंधित नियमांचे पालन आंदोलकांना करावा लागणार आहे. तसेच आंदोलनादरम्यान शेतकरी दिल्लीतील इतर कुठल्याही भागात जावू शकणार नाहीत, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
काल (दि.२७) संध्याकाळच्या सुमारास शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या एका पथकाकडून बुराडी परिसरात आणण्यात आले. पोलिसांकडून सात्यत्याने शेतकरी नेत्यांसोबत चर्चा केली जात आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून हरियाणा-पंजाबच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे सर्वसामान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता.
शुक्रवारी सिंधू बॉर्डरवर शेतकरी तसेच पोलिसांमध्ये झटापटी झाल्या. शेतकऱ्यांकडून दगडफेक करण्यात आल्यानंतर पोलिसांकडून अश्रू धुराच्या नळकांड्या तसेच पाण्याचा मारा करण्यात आला.आंदोलकांसाठी राज्यात तात्पुरत्या स्वरुपाचे तुरुंग बनवण्याची दिल्ली पोलिसांची तयारी होती. पोलिसांनी राज्य सरकारकडे नऊ स्टेडियम उपलब्ध करवून देण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. पंरतू, राज्य सरकारने परवानगी नाकारली. शेतकरी आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर दिल्लीच्या सीमेलगतचे अनेक मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत. राज्यातील इतर ठिकाणी देखील कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.







