दोंडाईचा (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात जात पडताळणी कार्यालय आहे. मात्र या कार्यालयात इतर जातींची जातपडताळणी होते पण आदिवासी जमातीसाठी मात्र ४०० किलोमीटर दूर, रक्त – नातेसंबंधातील निर्णय इतर जातींना पण आदिवासी जमातीला लागू नाही. कायदा हा सर्वांसाठी समान हे वाक्य फक्त कायदावरच राहते.
सर्व जातींना जात पडताळणी प्रमाणपत्र लगेच मिळते, पण आदिवासी कोळी समाजाच्या माणसाला हे प्रमाणपत्र काढावयाचे असल्यास हजारो पुरावे लागतात, खूनाच्या केससारखी पोलीस चौकशी लावली जाते. आदिवासी कोळी जमातीचे वैधता प्रमाणपत्र नाकारले तर हायकोर्टात दाद मागावी लागते, जिल्हा कोर्टात दाद मागितलेली चालत नाही. आदिवासी कोळी समाजावर हा अन्याय होत असून, केवळ आपल्यात एकी नाही म्हणून आपल्या मुलांच्या तोंडातील आलेला घास हिसकावून घेतला जात आहे. आता आपल्या हक्कांसाठी एकीने लढले पाहिजे, असे आवाहन अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाज धुळे जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष संतोष कोळी यांनी केले आहे.







