- पोलीस आयुक्तांच्या भूमिकेकडे पनवेलकरांचे लक्ष
- कारवाईचे आदेश तत्काळ देण्यात यावेत
नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे ) – परिमंडळ 2 च्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अवैध धंदे जोरदार सुरु आहेत. तत्कालीन पोलीस आयुक्तांनी बेकायदेशीर धंदे उद्घवस्त केले होते. मात्र आयुक्त बदलीनंतर पुन्हा अवैध धंदे सुरु झालेले आहेत. या धंद्याना लगाम लावावा व सर्व बेकायदेशीर धंदे बंद करण्यात यावेत अशी मागणी राजे प्रतिष्ठान कामगार सेनाचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्याकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, यांना मेलद्वारे देण्यात आले आहे.

नवी मुंबई आयुक्तालय हद्दीमध्ये परिमंडळ – 2 मध्ये ऑनलाईन जुगार, सोशल क्लब, गुटखा विक्री, गांजा विक्री, हुक्का पार्लर, जुगार यासारखे अवैध धंदे दिवसेंदिवस वाढत आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांची बदली झाली व त्याजागी बिपीनकुमार सिंह यांची वर्णी लागली. संजय कुमार यांनी आपल्या कार्यपद्धतीने अवैध धंदे करणाऱ्यांवर अंकुश ठेवला होता तसेच नव्याने आलेले आयुक्त बिपीनकुमार सिंह हे देखील नशामुक्ती करण्यासाठी मेहनत घेत आहेत. परिमंडळ 2 हद्दीतील पनवेल शहर, कामोठे याठिकाणी सध्या तीनपत्ती जुगार, गुटखा विक्री व ऑनलाईन जुगार यासारखे प्रकार वाढीस लागले असून विशेषतः कामोठे यामध्ये अग्रेसर आहे. नुकतेच खांदा गाव (कर्नाळा स्पोर्ट्स मैदानासमोर) जुगाराचा अड्डा सुरु झाला असून पनवेल रेल्वे स्थानक तक्का परिसरात देखील जुगाराचा अड्डा सुरु होत असल्याची माहिती हाती येत आहे.

तसेच पनवेल परिसरात अवैध गुटखाविक्री देखील जोरात सुरु असून आजही प्रत्येक टपरीवर गुटखा सहजरित्या मिळत आहे. कामोठे येथे खुलेआम विनापरवाना गुटखा विक्री करण्यासाठी एका इसमाने कारच लावली असल्याचे चित्र आहे. तसेच हुक्कापार्लरमुळे तरुणाई नशेच्या विळख्यात पडत असून कामोठे येथे आजही 3 ते 4 हुक्का पार्लर सुरु आहेत तसेच ऑनलाईन जुगार म्हणजेच बिंगो यांनी देखील तरुणाईला जास्त पैश्याचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढत आहेत. पनवेल परिसरातील अंमली पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी या आधी अनेकदा निवेदन दिले असून पनवेल शहरातील तरुणाई एक भयानक नशेच्या दुनियेत प्रवेश करीत आहे. नशा केल्यानंतर खून, चोरी, मारामारी यासारखे प्रकार घडून अनेक तरुण मुलांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
पनवेलमधील युवा वर्ग सध्या एका वेगळ्या आणि अतिशय भयानक अशा नशेच्या दुनियेत प्रवेश करीत आहे. अंमली पदार्थ विकणारे व सेवन करणारे यांच्यावर कडक कारवाई करणे हि काळाची गरज निर्माण झाली असून यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी या बेकायदेशीर सुरु असणाऱ्या धंद्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश संबंधित पोलीस अधिकारी यांना देण्यात यावेत अशी मागणी राजे प्रतिष्ठान कामगार सेनाचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्याकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या धंद्याबाबत पोलीस आयुक्त काय भूमिका घेतात याकडे पनवेलकरांचे लक्ष लागले आहे.







