छत्तीसगडमध्ये नक्षल्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात 10 जवान जखमी
नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि.कुबेर जाधव) – छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या IED स्फोटात नाशिकचे सुपुत्र सहाय्यक कामांडर नितीन भालेराव शहीद झाले आहेत. या स्फोटात एकूण 10 जवान जखमी झाले आहेत. त्यात 4 जवानांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय. सर्व जखमींना रात्री एअरलिफ्ट करण्यात आलं आहे. शहीद नितीन भालेराव हे नाशिकचे सुपुत्र आहेत. नाशिकच्या राजीव नगर भागात त्यांचे कुटुंबीय वास्तव्याला आहे.
ताडमेटला परिसरात नक्षलवाद्यांनी रात्री 2 आयईडी स्फोट घडवून आणले. या स्फोटात कोबरा 206 बटालियनचे सहाय्यक कामांडर नितीन भालेराव यांच्यासह 1 अधिकारी आणि 8 जवान जखमी झाले. नितीन भालेराव यांनी अत्यंत गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर अन्य 9 जवानांवर उपचार सुरु असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नाशिकचे सुपुत्र सहाय्यक कामांडर नितीन भालेराव हे छत्तीसगडमध्ये शहीद झाले आहेत. त्यांच्या कंपनी कमांडरशी आपलं बोलणं झाल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. शहीद नितीन भालेराव यांचं पार्थीव रायपूरवरुन विमानाने मुंबईत आणलं जाईल. तिथून ते नाशिकला येईल. त्यानंतर नातेवाईक यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. देशासाठी बलिदान देणाऱ्या नाशिकच्या वीर योद्ध्याला मन:पूर्वक श्रद्धांजली, अशा शब्दात जिल्हाधिकाऱ्यांनी शहीद नितीन भालेराव यांना आदरांजली वाहिली.







