नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि. कुबेर जाधव) – उसाचा पट्टा म्हणून ओळख असलेल्या परिसरात कधी नव्हे ते यंदा साडेतीन हजार ते सात हजार रुपये किलोने बियाणे शेतकर्यांनी खरेदी केल्याने व मोठ्या प्रमाणात कांद्याचे रोप टाकल्याने निफाड, लासलगावनंतर प्रथमच परिसरात यंदा घर-घर कांदा अशी स्थिती निर्माण झाली आहे.
देवळाली प्रवरा परिसराचे सुमारे चार, साडेचार हजार हेक्टर बागायती क्षेत्र आहे. पैकी 90 ते 95 टक्के क्षेत्रावर कांदा लागवड होण्याची शक्यता असल्याने यंदा परिसरात कांदा लागवडीचा नवा विक्रम होण्याची शक्यता असल्याचे काही शेतकरी बांधवांनी सांगितले.
यंदा ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस सुरू असल्याने कांदा लागवडीसाठी रान तयार करण्यास व कांद्याचे रोप टाकण्यास उशीर झाला. ऑक्टोबरमध्ये ज्यांनी रोप टाकण्याची घाई केली, त्यांची रोपे पावसाने वाया गेल्याने त्यांना पुन्हा रोप टाकण्याची वेळ आली. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात कांद्याचे दर दहा हजारांच्या जवळपास राहिल्याने जास्तीतजास्त शेतकरी कांदा लागवडीकडे वळाले.
यंदा सर्वत्र भरपूर पाऊस व अतिवृष्टीमुळे कांदा मोठ्या प्रमाणात वाया गेला. याचा परिणाम कांदा दरावर झाला. सुरुवातीला दोन ते अडीच हजार असणारा कांदा लॉकडाऊनमध्ये स्थिर राहिला. परंतु लॉकडाऊन उठल्यानंतर कांदादराने उसळी घेतली. सरकारने निर्यातबंदी करून देखील कांदादरात रोज नवा उच्चांक होत राहिला.
यातूनच शेतकर्यांना कांदा लागवडीला प्रोत्साहन मिळाले असल्याचे बोलले जात आहे. शेतकर्यांनी टाकलेले रोप आता लागवडीला आले आहे. ज्यांची अगोदर रानं तयार होती, त्यांची लागवड सुरू झाली आहे. काहींची लागवड झाली आहे. तर काही शेतकरी कपाशी व उसाच्या क्षेत्रात कांदा लागवड करणार असल्याने त्यांची रानं तयार होण्यास आठवडाभराचा अवधी लागणार आहे.
त्यानंतर मात्र, मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीची झुंबड उडणार आहे. पारंपरिक सरी पध्दतीऐवजी अनेकजण वाफा पध्दतीने व ठिबक सिंचनद्वारे कांदा लागवड करण्यावर भर देत आहेत. यामुळे रानोमाळ शेतीकामाला वेग आला आहे. त्यातच उसाचा गळीत हंगाम सुरू असल्याने ऊसतोड जोरात सुरू आहे. त्यामुळे नेहमी निर्मनुष्य असलेले शेतशिवार बाया, माणसांनी फुलून गेले आहे.
दरवर्षी कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळी नसल्याने मोठ्या प्रमाणात सडत असल्याने शेतकर्यांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसत होता. परंतु गेल्या काही वर्षापासून कांद्याला चांगला दर मिळत असल्याने प्रत्येकाने कांदाचाळी तयार केल्याने भाव आल्यानंतरच कांदा बाहेर काढण्यात येत असल्याने दोन पैसे जादा शेतकर्यांच्या पदरात पडत आहेत. कांदा लागवडीचे क्षेत्र वाढल्याने ट्रॅक्टरवाले, महिला व पुरुष मजूर यांना सुगीचे दिवस आले आहेत.
यंदा सुरुवातीला कांदा बियाणाचे भाव प्रतिकिलो, दोन, अडीच हजार होते. परंतु जसजशी मागणी वाढत गेली, तसतसे बियाणे कंपनीने दरवाढ सुरू केली. शेवटी-शेवटी तर हे दर सातहजार रुपये प्रतिकिलो करून बियाणे कंपन्यांनी आपले उखळ पांढरे केले. खासगी बियाणेवाले देखील मागे राहिले नाहीत. वीस हजार ते पस्तीस हजार रुपये पायलीप्रमाणे कांदा बियाणाची विक्री झाली. हा देखील नवा विक्रम समजला जात आहे. कांदा पिकाला सरासरी साठ ते सत्तर हजार रुपये लावणीपासून खर्च येतो. यंदा बियाणे जादा महाग असल्याने हा खर्च लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. एका एकरात साधारणपणे दहा ते बारा टन माल निघतो. तीन ते पाच हजारांचा भाव मिळाला तरी साधारणपणे पाच लाख ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. पिकाचा कालावधी चार महिन्यांचा असल्याने शेतकरी याकडे वळले आहेत.







