मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त प्रबोधनकार ठाकरेंचे पुरोगामी विचार आणि साहित्य लोकांपर्यंत कसे पोहचवता येतील, याचे नियोजन करण्यासाठी एक आढावा बैठक मंत्रालयात पार पडली.
या बैठकीत साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील, राज्य मराठी विकास संस्थेचे संजय पाटील, प्रा. दीपक पवार, प्रा. महावीर मुळे, सचिन परब, सुनील वेलणकर यांनी सूचना केल्या. डॉ. विठ्ठल घुले यांनी प्रबोधनकारांचे ‘प्रबोधन’ शिवाय इतर साहित्य पुन्हा प्रकाशित करावे तसेच ‘तरुणांसाठी प्रबोधनकार’ असे पुस्तक काढावे अशी सूचना केली. या बरोबरच त्यांनी शताब्दी महोत्सवानिमित्त सामाजिक कार्य व पत्रकारिता या क्षेत्रात प्रबोधनकारांचा वारसा पुढे नेणाऱ्यांना पुरस्कृत करण्यात यावे व एकपात्री प्रयोगांचे आयोजन करण्यात यावे, असे देखील सुचविले.
डॉ. मनिष देशमुख यांनी प्रबोधनकारांच्या ‘उद्योजक’ म्हणून असलेल्या दुर्लक्षित कारकिर्दीला लोकांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली. या बैठकीत करण्यात आलेल्या सर्व सूचनांची नोंद घेतली असून त्यांची दोन विभागात वर्गवारी करून त्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार आहेत.







