नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – नेरूळ सेक्टर २५ मधील पालिका विभाग सिउड दारावे रेल्वे स्टेशनसमोरील महापालिकेच्या श्री श्री राधाकृष्ण उद्यानात सीसीटीव्ही व पूर्णवेळ सुरक्षा रक्षकाची मागणी करताना नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस गुरुनाथ नाईक यांनी भविष्यात या उद्यानात दुर्घटना घडल्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहील असा सज्जड इशारा महापालिका प्र्रशासनाला दिला आहे.
दारावे रेल्वे स्टेशन यासमोरच नेरूळ सेक्टर २५ परिसरात महापालिकेचे उद्यान व क्रिडांगण आहे. उद्यानात पूर्णवेळ सुरक्षा रक्षक व सीसीटीव्ही असणे आवश्यक आहेे. या उद्यानात सकाळपासून सांयकाळपर्यत प्रेमी युगलेही बसलेली असतात, अनेकदा त्यांच्यात नको ते अश्लिल चाळेही होत असतात. रात्री अंधार पडल्यावर उद्यानाचा ताबा गर्दुल्यांनी घेतलेला पहावयास मिळतो.
या उद्यानात हाणामारीच्या घटना, प्रेमी युगलांचे अश्लिल चाळे आणि रात्री गर्दुल्यांचा उपद्रव पाहता उद्यानाची वेळ निश्चित करावी व त्यावेळी सुरक्षा रक्षक उपलब्ध असणे आवश्यक आहे. उद्यानात सीसीटीव्ही यंत्रणा बसविल्यास कायदा व सुव्यवस्थेलाही ते हातभार लावण्यासाठी उपयुक्त ठरेल. समस्येचे गांभीर्य व आमच्या म्हणण्यामागील कळकळ आपण लक्षात घेवून आमच्या मागणीला लवकरात लवकर न्याय द्याल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. उद्या आमच्या मागणीला केराची टोपली दाखवित कानाडोळा केल्यास आणि दुर्घटना घडल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासनच जबाबदार राहील असा इशारा गुरुनाथ नाईक यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.







