नेरूळ सेक्टर २५मधील पालिका उद्यानात संगीत यंत्रणा बसवावी यासाठी गुरुनाथ नाईकांचा पाठपुरावा कायम
नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – नेरूळ सेक्टर २५मधील महापालिकेच्या उद्यानात व क्रिंडागणात संगीत यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी दारावे गावातील नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे सरचिटणीस गुरुनाथ नाईक यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
महापालिका आयुक्त यांना दिलेल्या लेखी निवेदनात गुरुनाथ नाईकयांनी म्हटले आहे की, नवी मुंबई महापालिका प्रभाग ९२ व ९९ मध्ये महापालिकेचे श्री श्री राधाकृष्ण उद्यान व सिउड दारावे रेल्वे स्टेशन हे बाजूबाजूलाच आहे. या उद्यानात व क्रिडांगणात सकाळी व संध्याकाळी दारावे गाव व नेरूळ सेक्टर २५मधील रहीवाशी व ग्रामस्थ चालण्यासाठी (मॉर्निग वाक) व विसावा घेण्यासाठी येत असतात. यामध्ये महिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.नेरूळ सेक्टर २५ मधील श्री श्री राधाकृष्ण उद्यानात काही महिन्यापूर्वीच संगीत यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे.
त्याधर्तीवर या विभागातील उद्यानात संगीत यंत्रणा लवकरात लवकर सुरू करावी. ज्यामुळे सकाळी व संध्याकाळी उद्यानात येणाऱ्या रहीवाशांना भावगीते व अन्य गीते ऐकावयास मिळतील. त्यांचे मन प्रसन्न राहील. थकवा गायब होईल. स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्यासाठी आमच्या मागणीचा सकारात्मक विचार करून अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याची मागणी गुरुनाथ नाईक यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.







