कलाकारांचे प्रश्न शासनामार्फत सोडवण्याची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली ग्वाही
मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – मराठी नाटक , चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार, लेखक , दिग्दर्शक, निर्माते आणि तंत्रज्ञांनी उपमुख्यमंत्री माननीय ना. अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.३) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी अजित पवार यांनी सर्व कलाकारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुंबई येथील अध्यक्ष मनोज व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले. तसेच बुकिंग क्लार्क आणि व्यवस्थापक संघाचे सचिव आणि समाज सेवक हरी पाटणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाटक- चित्रपट- साहित्य- कला विभागात मुंबई उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी नाट्य चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आणि कलाकार तंत्रज्ञांनी हरी पाटणकर यांना अभिनंदनीय शुभेच्छा दिल्या आणि नाट्य चित्रपट क्षेत्रातील पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.







