‘त्या’ दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी वर्गातच लग्न केले, व्हिडिओ व्हायरल

marriage

हैदराबाद – आंध्र प्रदेशातील पू्र्व गोदावरी जिल्ह्यात एक बाल विवाहाचा आश्चर्यचकित करणारे प्रकरण उघड झाले आहे. जिल्ह्यातील रजा महेंद्रवरम परिसरातील एका शाळेत एका विद्यार्थ्याने आपल्या प्रेयसीशी वर्गातच लग्न केले. या विद्यार्थ्याने विद्यार्थिनीला मंगळसूत्र घालून तिला कुंकू लावले. हे दोघेही अल्पवयीन आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली. पोलिसांनी बाल विवाह अधिनियम, २००६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

 

या घटनेबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, हे दोघेही पूर्व गोदावरी जिल्ह्यातील रजा महेंद्रवरम भागात असलेल्या एका शाळेत शिकत आहेत. हे दोघेही कथित स्वरुपात बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड आहेत. या दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचे होते. मुलाचे वय १७ वर्षे इतके आहे.

 

 

या विद्यार्थ्याने मुलीसाठी बाजारातून एक मंगळसूत्र आणि कुंकू विकत घेतले आणि तो थेट शाळेत पोहोचला. त्यावेळी मुलगी वर्गातच होती. या विद्यार्थ्याने प्रथम मुलीला मंगळसूत्र घातले आणि त्यानंतर तिच्या भांगामध्ये कुंकू लावले. या वेळी काही मित्रांनी या प्रसंगाचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या विवाहाबाबत सर्वांना समजले.

 

पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, मुलीचे समुपदेशन करण्यात आले आहे. या अल्पवयीन मुलांचा वर्गात कोणी विवाह करवला याचा तपास पोलिस करत आहेत. तर दुसरीकडे नवरा आणि नवरी हे एका वर्गात शिकणारे विद्यार्थी आहेत असे आंध्र प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा वासीरेड्डी पद्मा यांनी सांगितले. या अल्पवयीन मुलीला महिला आयोग आश्रय देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

शाळेने या दोघांनाही शाळेतून काढून टाकले आहे. तसेच त्यांच्या आईवडिलांनी देखील त्यांना घरात येण्याची परवानगी नाकारली असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा वासीरेड्डी पद्मा यांनी माहिती देताना सांगितले. समुपदेशनासाठी मुलीला स्टॉप सेंटर येथे पाठवण्यात आले आहे. महिला आयोगाने मुलाच्या आई-वडिलांचे देखील समुपदेशन केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here