सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. यानिमित्त देशभरातील असंख्य अनुयायी डॉ. आंबेडकरांना विनम्र अभिवादन करत आहेत. तर महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्यावर राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँगेसचे प्रेदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही डॉ. बाबासाहेबांना पत्राद्वारे अभिवादन केले.
बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी ६ डिसेंबरला लाखोंचा जनसागर चैत्यभूमीवर येत असतो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी “लेटर टू डॉ. बाबासाहेब” ही मोहिम राबवण्यात आली आहे. यावेळी जयंत पाटील यांनी आपल्या कार्यालयातून मोहिमेत सहभाग घेऊन चैत्यभूमीला एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी लिहले आहे,
प्रिय बाबासाहेब,
देशभरातील कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करत आहोत. तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करत आहोत. म्हणून देश हितासाठी आपल्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आमचे सरकार संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित असून इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी आम्ही अविरत कार्य करू, हे आमचे ध्येय आहे. उपेक्षित, वंचितांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू. महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा एक प्रबळ वारसा आहे. या विचारांना तडा न जाऊ देता समता, न्याय, बंधुता या मूल्यांचे आम्ही रक्षण करू.
चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे, इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील. याचा मला विश्वास आहे. महापरिनिर्वाण दिनी तुम्हाला विनम्र अभिवादन!
आपला,
जयंत पाटील







