डॉक्टरांच्या सल्याविना खाजगी प्रयोग शाळांमधून थेटपणे करता येणार कोवीड चाचणी

मुंबई (प्रतिनिधी) – कोरोना कोवीड – १९ या संसर्गजन्य आजाराला आळा घालण्यासाठी महापालिकेद्वारे सर्वस्तरीय प्रयत्न सातत्याने करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने आजाराचे लवकर निदान झाल्यास वेळेत उपचार सुरु करणे शक्य झाल्याने संबंधित रुग्ण लवकर बरा होण्याची संभाव्यता अधिक असते. ही बाब लक्षात घेऊन व मुंबई महापालिका क्षेत्रातील कोवीड विषयक वैद्यकीय चाचणी करण्याची खाजगी प्रयोगशाळांची वाढलेली संख्या व क्षमता लक्षात घेत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील खाजगी प्रयोगशाळांना डॉक्टरांच्या लिखित सल्ल्याशिवाय म्हणजेच डॉक्टरांच्या ‘प्रिस्क्रीप्शन’ शिवाय कोवीड विषयक वैद्यकीय चाचणी करण्याची परवानगी देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी नुकताच घेतला आहे. या निर्णयामुळे आता बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील निर्धारित खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये कोवीड विषयक चाचणी ही थेटपणे संपर्क साधून करवून घेता येणार आहे. यानुसार खाजगी प्रयोगशाळांमधून चाचणी करण्यासाठी शासनाने निर्धारित केलेले दर लागू असतील, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील १७ खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांना कोवीड विषयक वैद्यकीय चाचणी करण्याची परवानगी केंद्रशासनाद्वारे देण्यात आली आहे. यानुसार निर्धारित करण्यात आलेल्या खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये कोवीड विषयक वैद्यकीय चाचणी करण्यासाठी यापूर्वी डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन असणे गरजेचे होते. मात्र ही अट आता काढून टाकण्यात आली आहे. ज्यामुळे नागरिकांना त्यांची कोवीड विषयक चाचणी सहजपणे करवून घेणे शक्य होणार आहे. सदर चाचणी पॉजिटीव्ह आल्यास महापालिकेच्या विभागस्तरीय ‘वॉर रुम’द्वारे बेड अलॉअमेंट करण्यात येणार आहे. ज्यामुळे रुग्णावर पूर्वीच्या तुलनेत अधिक लवकर वैद्यकीय औषधोपचार करणे शक्य होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here