मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पातळीवरील 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील परीतेवाडीच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या सह त्यांच्या माता पित्यांचा माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तसेच सोलापूर सारख्या दुष्काळी समजल्या जाणाऱ्या भागातील जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी हा पुरस्कार मिळवला ही खरंच अभिनंदनीय बाब आहे ,असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच रणजितसिंह डिसले यांच्या सारख्या शिक्षकांना सोबत घेऊन महाराष्ट्र राज्यातील शिक्षण अव्वल दर्जाचे करणार असे सांगितले.
आपल्या शाळांमधील काम उत्तम आहे याचा दाखला डिसले गुरुजीं मुळे मिळाला आहे असं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे , शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड , परिवहन मंत्री ॲड.अनिल परब आदी मान्यवर उपस्थित होते.







