धुळे (प्रतिनिधी) – वडिलोपार्जित घरावर वारसदाराचे नाव लावण्यासाठी 15 हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 11 हजार रूपयांची लाच घेतांना परिरक्षण भुमापकाला रंगेहाथ पकडण्यात आले. धुळे एसीबीच्या पथकाने आज दुपारी शिरपूरातील भूमिअभिलेख कार्यालयात ही कारवाई केली.शिरपूरातील तक्रारदाराला वडिलोपार्जित घरावर वारसदाराचे नाव लावायचे होते.
यासाठी ते उपअधीक्षक, भुमिअभिलेख कार्यालयात गेले होते. तेव्हा कार्यालयातील परिरक्षण भुमापक राजू छगन पवार (वय-52) यांनी वारसदार लावण्यासाठी तक्रारदाराकडे 15 हजार रूपये लाचेची मागणी केली. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने आज दुपारी शिरपूरातील भुमिअभिलेख कार्यालयात सापळा लावला.
तेव्हा राजु पवार यांनी तक्रारदाराकडून तडजोडी अंती 11 रुपयाची मागणी करून लाच स्विकारल्यानंतर पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.त्यांना ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.ही कारवाई पोलीस उप अधीक्षक सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सुधीर सोनवणे, संदीप सरग, भुषण खलानेकर, कृष्णकांत वाडीले यांनी केली आहे.