नाशिक (विशेष प्रतिनिधी) – गेल्या आठ महिन्याच्या करोना संकटामुळे सर्वच व्यावसायांना मोठा अर्थिक फटका बसलेला असल्याने यात सांस्कृतिक नाट्य क्षेत्राला अधिक आर्थिक फटका बसला आहे. शहरातील सांस्कृतिक व नाट्य क्षेत्र संबंधीत संघटनांनी दिलासा देण्यासाठी महापालिकेच्या महाकवि कालिदास कलामंदीराच्या भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात देण्याच्या मागणीनुसार मनपा स्थायी समितीच्या सभेत सभापती गणेश गिते यांनी पुढच्या वर्षभरासाठी ५० टक्के भाडेकपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे नाट्य व सांस्कृतिक मोठा दिलासा मिळाला आहे…
एप्रिल महिन्यात करोना साथीच्या कारणास्तव जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे सात महिने राज्यभरातील नाट्यगृहे व सिनेमा गृहे बंद ठेवण्यात आले होते. परिणामी नाट्य व सिने क्षेत्राला मोठा अर्थिक फटका बसला.या क्षेत्रातील कामगारांची मोठी उपासमार झाली. अखेर नोव्हेंबर महिन्यात शासनाने नाट्यगृहे व सिनेमा थिएटर खुली करण्यास परवानगी दिली. यात नाट्यगृह – सभागृह यातील आसन व्यवस्थेच्या पन्नास टक्के आसनावर कार्यक्रम घेण्यासह अनेक अटी शासनाने करोना प्रादुर्भाव रोकण्यासाठी घेतला आहे.
लॉकडाऊनच्या काळात नाशिक महापालिका प्रशासनानेही शहरातील अद्यावत असलेले महाकवी कालिदास कलामंदिराची या काळात दुरुस्ती करीत करोना प्रादुर्भाव रोकण्यासाठी याठिकाणी सॅनिटायझरची फवारणी केल्यानंतर मंहापालिकेचे दादासाहेब गायकवाड सभागृह व महात्मा गांधी सभागृह याठिकाणी कार्यक्रमांना ५० टक्के आसनांवर बसण्यासह सशर्त परवानगी दिली आहे. असे असतांना महापालिकेकडुन कालिदास कलामंदिर, दादासाहेब गायकवाड सभागृह व महात्मा गांधी सभागृहाच्या भाड्यात कपात केली नव्हती. यामुळे शहरातील नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रातील संघटनांनी भाडे कपात करण्याची मागणी केली होती. यानुसार प्रशासनाने ५० टक्के भाडेकपातीचा प्रस्ताव आजच्या स्थायी समितीच्या सभेत ठेवला होता.
हा प्रस्ताव मर्यादीत कालावधीसाठीच मंजूर करावा अशी सुचना अशोक मुर्तडक यांनी केली. त्यानुसार सभापती गिते यांनी एका वर्षाच्या कालावधीसाठी महाकवी कालिदास कलामंदिरासह इतर मनपाच्या दोन सभागृहाच्या भाड्यात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय जाहीर केला.







