मुंबई (संपादक सुनिल पाटील) – खा. शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अतिशय उत्कृष्ठ असा व्हर्च्युअल रॅलीचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी झालेले सर्व कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष आणि फ्रंटलच्या सर्व कार्यकर्त्यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी अभिनंदन केले.
१२ डिसेंबर हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. तो क्षण आज आपण एकत्र घालवला याचा आनंद होतोय. राज्यात मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहेत. हे काम आपल्याला पुढे न्यायचे आहे कारण राज्यावर संकट आल्यानंतर आपण धावून गेले पाहीजे, ही पवार साहेबांची शिकवण आहे, असे अजित पवार म्हणाले.
मागील ५० वर्षांपासून आपण पवार साहेबांना सामाजिक जीवनात काम करताना पाहतोय. ८० व्या वर्षीही ते त्याच ताकदीने काम करत आहेत. मला तर वाटतं, पवार साहेबांसारखा नेता या शतकात तरी होणार नाही. पवार साहेबांसारखे नेते आपल्याकडे आहेत, याचा मला अभिमान आहे. राज्यातील १३ कोटी जनतेच्यावतीने आणि उपमुख्यमंत्री या नात्याने हिमालयाच्या उंचीच्या महाराष्ट्राच्या या सह्याद्रीला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा, असे अजित पवार म्हणाले.







