आटपाडी (प्रतिनिधी) – भारताचे ज्येष्ठ नेते शरद पवार हेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नीती आणि नेतृत्वाला समर्थ उत्तर आणि पर्याय ठरू शकतात . देशातील भाजप विरोधी सर्व पक्षांनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आघाडी करण्यासाठी मुख्यमंत्री ना .उध्दव ठाकरे साहेब आणि त्यांच्या शिवसेनेने पुढाकार घ्यावा , असे आवाहन मुस्लीम खाटीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष सादिक खाटीक आटपाडी यांनी केले आहे .
शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त आनंद व्यक्त करीत ते शतायुषी व्हावेत , उत्तम आरोग्य आणि जागतिक स्तरावर कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी विधात्याने त्यांना द्यावी अशी प्रार्थना करून सादिक खाटीक विविध दैनिकांशी बोलताना म्हणाले, सर्व विचारांना मोडीत काढतच मोदी शहा जोडी पुढे जात आहे , कॉंग्रेस मुक्त देश हा त्यातलाच प्रकार पण सर्व विधायक शक्ती एकवटून समर्थ पर्याय देणे ही शरद पवारांची आजच्या राजनीतीला देणगी आहे. हे लक्षात घेऊन पवार साहेबांच्या देशव्यापी नेतृत्वाबद्दलच्या शिवसेनेच्या आश्वासक भूमिकेने देशातील भाजप विरोधी सर्वच पक्ष एकत्र येतील आणि त्या एकजुटीतून देशात परिवर्तन होवू शकते .
काँग्रेस पक्षानेही पवारांनी कॉंग्रेसमध्ये दिलेल्या दोन तपाच्या बहुमुल्य योगदानाचा विचार करून भाजप आणि मोदी – शहा नीती विरोधी लढयाचे नेतृत्व त्यांच्याकडे दयावे आणि पंतप्रधानपदासाठी शरद पवार साहेब हेच समर्थ आणि सक्षम पर्याय असल्याचे स्पष्ट करीत मोठे औदार्य दाखवावे .
ते पुढे म्हणाले , समोर कोणी पैलवानच नाही , अबकी बार २२० के पार , पवारांचे राजकारण संपले असे हिनवत , सत्तेच्या जोरावर कॉंग्रेस , राष्ट्रवादी कॉंग्रेस यांना संपवायला निघालेल्या भाजप सरकार आणि त्यांच्या धुरीणांना या विधानसभा निवडणूकीत दिवसा चांदण्या दाखण्याचे काम शरद पवार नावच्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड उर्जा असणाऱ्या ऐंशी वर्षाच्या योध्दा युवकाने करून संपूर्ण देशाला स्तंभीत केले , पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा , तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इत्यादींच्या झंझावाताला एकहाती रोखत त्यांनी भीमपराक्रम केलाच शिवाय टोकाच्या परस्पर विरोधकांनाही एकत्र आणू शकतो , दगाबाजांना नेस्तनाबूत करू शकतो ,देशाला सक्षम नेतृत्व आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नीती आणि नेतृत्वाला समर्थ पर्याय देवू शकतो हेच अप्रत्यक्षरित्या पवारसाहेबांनी दाखवून दिले आहे .
देशाच्या इतिहासात मराठी माणसाला दिल्लीच्या तख्तावर बसता आले नाही . ही शेकडो वर्षांची वस्तुस्थिती आहे . देशाच्या स्वातंत्र्याच्या सत्तरीपर्यंत आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या रूपाने मिळालेले उपपंतप्रधान पद हा दुसऱ्या क्रमांकाचा अपवाद वगळता आज अखेर मराठी माणसाला पंतप्रधान पद मिळू शकले नाही .१५ वर्षापूर्वीच श्री . शरद पवार साहेबांच्या कर्तृत्वाचा , ज्येष्ठतेचा, सन्मान म्हणून त्यांना पंतप्रधान पद मिळावयास हवे होते .परंतू त्यावेळच्या राजकारणाने राज्याच्या न्याय हक्काचा घात केला . अल्पमतातल्या माजी पंतप्रधान चंद्रशेखर, या उत्तर प्रदेश सारख्या मोठया राज्याच्या नेत्याचा अपवाद वगळता एच .डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल ही पुरेशी संख्याबळ पाठीशी नसणारी नेतेमंडळी आणि मोरारजीभाई देसाई, पी .व्ही. नरसिंहराव , मनमोहनसिंह, आणि नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रापेक्षा लहान असणाऱ्या राज्यांचे नेते पंतप्रधानपदी विराजमान झाले, हा इतिहास आहे , पवारांच्या नेतृत्वाखाली विरोधक एकवटल्यास देशात झंझावाती समर्थन मिळू शकते . देशातल्या भाजप विरोधी सर्व राष्ट्रीय , प्रादेशीक पक्षांमध्ये लोकप्रिय असणारे , सर्वात अनुभवी, सर्वात वरिष्ठ आणि संसदीय कार्यप्रणालीचा अर्धशतकाचा सखोल , चौफेर अभ्यास असणारे शरद पवार साहेब, सर्वमान्य , सर्वस्पर्शी, सर्वप्रिय, आणि सर्वोत्तम ठरतील असे महाराष्ट्राचे कोहीनुर आहेत . शरद पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राचा , मराठी माणसांचा, पर्यायाने जगातल्या सर्वच महाराष्ट्रीयनांचा यथार्थ गौरव होवू शकतो . ही भावना लक्षात घेवून राज्यातील भाजप विरोधी सर्व पक्षांनी मराठी अस्मितेसाठी एकत्र यावे . देशापुढे पवार साहेबांच्या रूपाने मोदी शहा नीतीला सक्षम पर्याय उभा करावा .
गेल्या ३२ वर्षात आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या आश्नयाने शुन्यवत असणाऱ्या भाजपाने राज्यात आपले बस्तान बसविले , निर्णायक क्षणी भाजपाने मुख्यमंत्री पदा च्या मागणी वरून शिवसेनेला बाजुला सारले, तथापि ३२ वर्षाच्या आपल्या पारंपारीक विरोधी पक्षाला सत्तेवर आणत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे रूपाने ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेचा गौरव करण्याचे काम शरद पवारसाहेबांनी केले आहे .मुख्यमंत्री श्री .उध्दव ठाकरे आणि शिवसेनेने मराठी अस्मितेसाठी पवारसाहेबांच्या रूपाने देशाला सक्षम नेतृत्व आणि पंतप्रधान नरेंद मोदीं च्या नीती आणि नेतृत्वाला समर्थ उभा करण्यासाठी पवारसाहेबांचे खंदे पाठीराखे बनत देशाला नवी दिशा देणारे पाऊल टाकावे. मराठी माणसांनी या मराठी अस्मितेच्या भूमिकेला जोरदार उचलून धरावे असे आवाहन ही सादिक खाटीक यांनी या निमित्ताने केले आहे .







