प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी माथाडी कामगारांचा लाक्षणिक बंद

navi-mumbai-bazar-samiti

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्याकरिता १४ डिसेंबर या दिवशी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांनी एक दिवसाचा लाक्षणिक बंद केला.
दरम्यान या बंदची नोंद घेत २४ डिसेंबरला गृहमंत्र्यांनी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती माथाडी कामगारांचे नेते तथा महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी दिली.

 

या बंदमध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा व इतर ठिकाणचे माथाडी कामगारही सहभागी झाले होते. त्यामुळे राज्यातील या मोठ्या बाजार समित्या बंद होत्या. कोठे अनुचित प्रकार न होता हा बंद शांततेत पार पडला.

 

या वेळी नरेंद्र पाटील म्हणाले की, माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आत्तापर्यंतच्या सर्व सरकारला अपयश आले आहे. कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मुंबई आणि उपनगरात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये म्हणून बाजार समिती कोणत्याही परिस्थितीत चालू ठेवण्याची सूचना केली होती. त्यानुसार सर्व माथाडी कामगारांनी जीवाची पर्वा न करता सर्व बाजार पेठेमध्ये दिवसरात्र काम केले; यामध्ये ५ कामगारांचा कोरोनाने मृत्यू झाला; परंतु त्यांना आर्थिक साहाय्य देण्याची वेळ आली तेव्हा सरकारने हात वर केले आहे. इतकेच नव्हे, तर कामगारांना लोकलने प्रवास करण्याचीही अनुमती दिली नाही. आई जेवू देईना आणि बाप भीक मागू देईना, अशी कामगारांची या सरकारने स्थिती निर्माण केली आहे. त्याच बरोबर गेल्या अनेक वर्षांपासून माथाडी कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहेत, ते सोडवण्यासाठी सरकार चालढकलपणा करत आहे. या निषेधार्थ आजचा बंद पुकारून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला असल्याचे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

 

माथाडी मंडळावर सदस्यांच्या नियुक्त्या करणे, कामगार क्षेत्रात गुंडगिरी करणाऱ्या टोळ्यांचा बंदोबस्त करणे, यांसह इतर मागण्यांसाठी माथाडी कामगारांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here