नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि.कुबेर जाधव) – अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाचा पट्ट्यामुळे राज्यात निर्माण झालेले ढगाळ वातावरण 17 डिसेंबर पर्यंत कायम राहणार असून मध्य महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात उद्या (दि.15) पर्यंत तुरळक पाऊस व गारपीटीची शक्यता असून यानंतर मात्र जिल्ह्यातील मोकळे होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
दरम्यान आज नाशिक जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरणात सकाळी काही भागात रिमझिम स्वरुपात अवकाळी पाऊस पडल्याने हवेतील गारवा कायम राहिला आहे. अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दक्षिणेतून येणारे बाष्पयुक्त वारे उत्तरेकडे येत आहे. परिणामी राज्यात ढगाळ वातावरण सलग चौथ्या दिवशी कायम राहिले आहे. या बदलेल्या वातावणाचा मोठा फटका किनारपट्टीला बसला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही भागात तुरळक स्वरुपाचा पाऊस पडत आहे. हे वातावरण येत्या 17 तारखेपर्यंत राहणार असून यानंतर मात्र थंडीची तीव्रता वाढणार आहे. उत्तर महाराष्ट्रात हे ढगाळ वातावरण 15 तारखेनंतर वातावरण निवळणार आहे. नाशिक जिल्ह्यात सलग तिसर्या दिवशी काही भागात अवकाळी पाऊस झाला. यामुळे हवोतील गारवा वाढल्याने रोगट स्वरुपाचे वातावरणाचा फटका शेतीपिकांना बसत आहे.
दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणाचा फटका शेतकर्यांना बसत आहे. सकाळी तर प्रचंड धुके पसरलेले दिसते. पिकांवर धुक्यासहीत दवबिंदू पडताना दिसतात. त्यामुळे सर्वत्रच ओल आलेली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये तर थंडीही वाढलेली आहे. धुक्याची झालर थंडीबरोबर शेतीपिकावर दिसत असल्यानेच शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
केवळ थंडी शेतीपिकासाठी पोषक राहिली असती. परंतु थंडीबरोबर पाऊस आणि धुके यामुळेच रब्बी हंगामावर अवकळा आलेली आहे. हवामान तज्ञांनी गारपिटीचाही धोका सांगितल्यानेही शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दिंडोरी तालुक्याच्या सर्वच भागात आता द्राक्ष होतात.
मोहाडी, कोराटे, खेडगाव, जानोरी, अक्राळे, लखमापूर, वणी, पांडाणे, मावडी, तिसगाव, गोंडेगाव, जोपुळ, मातेरेवाडील, बोपेगाव आदी भागात द्राक्षबागायतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. हे सर्व द्राक्षबागायतदार आता चिंतेत पडले आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे द्राक्षबागांवर या ढगाळ हवामानाचा फार विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकरी द्राक्षबागा वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे.
द्राक्षमालाची डिपिंग व घड थिनिंगची कामे वेगाने सुरु आहेत. द्राक्षांतर्गत सेंद्रीय खते पोषक विद्राव्य खतांचे डोस शेतकरी देतांना दिसत आहे. जादा औषध फवारणी करतांना शेतकरी दिसत आहे. शेतकर्यांना रोज हजार रुपयांपेक्षाही जास्त खर्च औषधावर करावा लागत आहे.
दिंडोरी तालुक्यातील खत दुकानांमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. अनेक शेतकर्यांना माल मात्र उधारीनेच खरेदी करावा लागत आहे. शेतकर्यांची उधारी वाढत चालली आहे. आता केंद्रसरकारच्या कायद्याविरोधात सर्व शेतकरी रस्त्यावर उतरले होते, पण आता आलेल्या अस्मानी संकटावर कशी मात करावी, असा प्रश्न शेतकर्यांपुढे उपस्थित होत आहे.







