अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – दि.१५ डिसेंबर मंगळवार रोजी जिल्हाधिकारी रायगड श्रीमती निधी चौधरी (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा एड्स नियंत्रण समितीची, “एचआयव्ही/टीबी, ग्रेटर इन्व्हॉलमेंट ऑफ पीपल लिविंग विथ एचआयव्ही एड्स (जिपा)” या समितीची आढावा सभा संपन्न झाली. या सभेमध्ये जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग रायगड, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग यांनी केलेल्या मागील पूर्ण वर्षाचा कामाचा आढावा घेऊन रायगड जिल्ह्यामध्ये एचआयव्ही संसर्गिताचे प्रमाण घटत असल्याचे सांगण्यात आले.
निधी चौधरी, भा.प्र.से. जिल्हाधिकारी रायगड, डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक रायगड, डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रायगड, डॉ. ठोकळ, जिल्हा क्षयरोग अधिकारी, श्री. संजय माने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डापकु, डॉ. चेतना पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, एन.एच.एम., डॉ. पांडुरंग शिंदे, वरिष्ठ वैदयकिय अधिकारी, एआरटी केंद्र अलिबाग, डॉ. दीपक गोसावी, आयसीटीसी इन्चार्ज/ रक्त संक्रमण अधिकारी, रश्मी सुंकले, जिल्हा असिस्टंट एम अँड ई, डापकु, प्रतिनिधी महिला व बाल विकास अधिकारी, श्री. पंकज पाटील प्रतिनिधी, महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट, पेण, प्रतिनिधी लोकपरिषद पनवेल, श्रीम. जयश्री मोकल, जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी, एन.एच.एम, रायगड,श्री. रवींद्र कदम, जिल्हा साहाय्यक लेखा, डापकु, श्री. मनोज बामणे, डॉट्स प्लस सुपरवायझर रायगड, श्री. पी. आर. किल्लेकर, संजय गांधी योजना, शाखा, श्रीम . जागृती गुंजाळ प्रतिनिधी, आधार विहान पनवेल ई. सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्या आदेशानुसार तसेच मार्गदर्शक सूचनेनुसार सदर वेळी “Elimation of Mother to Child Transmission Committee” (EMTCT) या सभेची स्थापना करण्यात आली. रायगड जिल्ह्यात एचआयव्ही संसर्गित रुग्णाच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा एड्स नियंत्रण विभाग कार्यरत आहे. या विभागाकडून एचआयव्हीबाबत प्रबोधन, एचआयव्ही ग्रस्तांचे समुपदेशन केले जाते. जिल्ह्यात २०१४-१५ मध्ये एचआयव्ही संसर्गित रुग्णाची संख्या ४१७ (०. ६८ टक्के ) इतके होते. त्यात घट होऊन नोव्हेंबर २०२० पर्यंत हीच संख्या अवघ्या १६० (०. ३ टक्के) येऊन ठेपली आहे. या घटत्या आकडेवारीवरून रायगड जिल्ह्याची एचआयव्ही मुक्तीकडे वाटचाल सुरु असल्याचे आशादायक चित्र आहे. एचआयव्ही म्हणजे मृत्यूचं, अशी भीती १९९० च्या दशकात होती. एचआयव्हीचा संसर्ग वेगाने होत असल्याने आणि विषयीच्या उपचारांची व्यापकता नसल्याने देशात १९९२ पासून एड्स नियंत्रणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. महाराष्ट्रात एचआयव्हीचे सर्वात जास्त रुग्ण मुंबईत आढळून येत होते. त्यामुळे आरोग्य विभागाने खबरदारी घेत एचआयव्ही संसर्ग रोखण्याला सर्वप्रथम प्राधान्य दिले. त्यानुसार सरकारी रुग्णालये, दवाखान्यामध्ये मोफत एचआयव्ही समुपदेशन चाचणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात २०१४-१५ मध्ये ६१५०४ रुग्णाची तपासणी करण्यात आली. त्यात ४१७ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले. सन २०-२१ मधील नोव्हेंबर २०२० पर्यंत ५९४०७ रुग्णाची तपासणी झाली असून अवघ्या १६० जणांना एचआयव्ही संसर्गित झाल्याचे समोर आले.
डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांनी दिलेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यात सर्वसामान्य जनता यामध्ये ज्याप्रमाणे एचआयव्ही संसर्गित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. त्याचप्रमाणे एचआयव्ही संसर्गित गरोदर मातांच्या संख्येतही घट होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात २०१४-१५ मध्ये ४१४३० गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २९ माता एचआयव्ही पॉझिटिव्ह आलेल्या असून त्यापैकी २९ माता या एआरटी उपचार घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. तर नोव्हेंबर २०२० पर्यंत २५७२९ गरोदर मातांची तपासणी झाली असून त्यामध्ये अवघ्या २० माता एचआयव्ही पॉझिटिव्ह आलेल्या असून त्यापैकी २० माता या एआरटी उपचार घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. सन २०२०-२१ मध्ये एकूण १५ बालकांची डीबीएस (Dry Blood Spot) तपासणी करण्यात आली असून १५ (१०० टक्के) बालके हि एचआयव्ही संसर्गित नसल्याचे स्पष्ट होत आहे. EMTCT कार्यक्रमांतर्गत मातेकडून बालकाला होणारा एचआयव्ही संसर्ग प्रतिबंध करण्यामध्ये शासनाला १०० टक्के यश आलेले आहे.
वरील आकडेवारीचा विचार करता रायगड जिल्ह्यामध्ये एचआयव्ही संसर्गित जनरल क्लायंट व गरोदर मातांच्या एचआयव्ही संसर्गित होण्याच्या प्रमाणामध्ये घट होत असल्याचे स्पष्ट होत आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मागील दहा वर्षांपासून आरोग्य यंत्रणेसह विविध सामाजिक संस्था कार्यरत आहेत. या सर्वांच्या मेहनतीमुळे जिल्ह्यात एड्स नियंत्रण दर कमी करण्यात यश आले आहे.
रायगड जिल्ह्यामधील जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये, नगरपालिका दवाखान्यांमध्ये एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्रात मोफत एचआयव्ही समुपदेशन उपलब्ध करण्यात आले आहे. सध्यस्थितीत त्याच्याच जोडीने सामान्यरुग्ण, गरोदर माता, क्षयरोगी यांचीही एचआयव्ही चाचणी करण्यात येते. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यास समुपदेशन करून रुग्णाला एआरटी (antiretroviral थेरॅपी ) केंद्रात पाठवले जाते. या केंद्रात रुग्णाला आहार व घ्यावयाची काळजी याविषयी समुपदेशन केले जाते. एचआयव्ही रुग्णांना विविध आजार होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या रक्ताच्या तसेच इतर आवश्यक चाचण्या केल्या जातात. त्यांना इतर कोणताही आजार होऊ नये याची काळजी घेतली जाते. तसेच त्यांचा सीडी४ काउन्ट वाढवून एचआयव्ही व्हायरल लोड कमी करणेकरीता योग्य वेळी एआरटी उपचार पद्धती सुरु केली जाते.
आयुक्त यांच्या सूचनेनुसार जिल्हास्तरावर मा. सर्वोच्च न्यायालयाने क्रिमिनल अपील क्र. १३५/२०१० मध्ये दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत सुटका करण्यात आलेल्या पीडितांना तसेच वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना कोरडे अन्नधान्य व आर्थिक सहायय करणेकरीता समिती गठन केली असून त्यामध्ये एकूण ४०१ महिलांना व १५ बालकांना कोरडे अन्नधान्य व आर्थिक मदत करण्यात आली असून दिनांक २८/१०/२०२० रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभेमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रत्येकी रक्कम रु. ५०००/- व त्यांच्या मुलांना प्रत्येकी रक्कम रु. २५००/- यानुसार लाभ देण्याचा आहे. त्यानुसार वरील यादीपैकी १३९ महिलांची बँकेमध्ये खाते उघडून त्यांची स्वतंत्र यादी महिला व बाल विकास विभागामार्फत मा. जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्या कार्यालयाकडे योग्य त्या आर्थिक मदतीकरिता पाठविण्यात आलेली आहे. आधार ट्रस्ट पनवेल यांच्या मार्फत कोविड १९ लॉकडाउन च्या कालावधीमध्ये एकूण ४६० पीएलएचआयव्ही याना अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले असल्याचे सांगितले.
ओएनजीसी कंपनी उरण यांच्यामार्फत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग याना मोबाईल आयसीटीसी व्हॅनचा पुरवठा करण्यात आला असून सदर वाहनांच्या मोडिफिकेशन करिता ओएनजीसी कंपनी उरण यांच्याकडे प्रस्थाव सादर करण्यात आलेला आहे. या सभेच्या वेळी डॉ. दीपक गोसावी, रक्त संक्रमण अधिकारी यांनी सन २०-२१ मध्ये ५५०० रक्त संकलन झालेले असून सद्यस्थिती रक्तपेढीमध्ये आवश्यक असणारा रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध असून यापुढे लागणाऱ्या रक्त संकलनाचे/ शिबिराचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा कारागृह तळोजा, सदर ठिकाणी आयसीटीसी केंद्राची मागणी केलेली असून त्यांच्या मागणीनुसार सदरचा प्रस्ताव मा. प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा मुंबई यांच्याकडे मंजुरीकरिता पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या सभेकरिता उपस्थित असणाऱ्या सर्व सदस्यांचे स्वागत तसेच आभार प्रदर्शन श्री. संजय माने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डापकु यांनी केले असून मा. जिल्हाधिकारी रायगड अलिबाग तथा अध्यक्ष जिल्हा एड्स नियंत्रण समिती रायगड यांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले.







