शेतकरी मेटाकुटीला, पालेभाज्यांचे दर घसरले

vegetable-rate-down

कोथिंबीर, शेपू 50 पैसे जुडी; ढगाळ वातावरणाने आवक दुप्पट

नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि.कुबेर जाधव) – पाऊस-ढगाळ वातावरण बदलल्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्यांची आवक दुपटीहून अधिक झाली. परिणामी पालेभाज्यांचे दर घसरले. हायब्रीड कोथिंबीरचा किमान भाव एकाच दिवसात 9 रूपयांवरून थेट 50 पैशांवर आला. शेपूलाही किमान 50 पैसे जुडी असाच भाव मिळाला.

 

दिवाळीवेळी आवक वाढल्याने कोथिंबीरचा किमान दर 50 पैसे असाच होता. त्यानंतर महिनाभर दरात चढ- उतार सुरू होते. गेले तीन-चार दिवस शहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला, तसेच ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे बाजार समितीत पालेभाज्यांची आवक घटल्याने गेले दोन दिवस गावठी कोथिंबीरला किमान 10, कमाल 32 व सरासरी 25 व हायब्रीडला 9-34-18 असा दर मिळाला होता. तेव्हा आवक 33 हजार जुड्या इतकी होती.

 

बुधवारी पाऊस व ढगाळ वातावरण काहीसे कमी होऊन कोथिंबीरची आवक 75 हजार 800 जुड्या झाली. मंगळवारी संध्याकाळी गावठी कोथिंबीरला 1-12-7 तर हायब्रीड कोथिंबीरला किमान 50 पैसे, कमाल तेरा व सरासरी सहा रुपये भाव मिळाला.

 

शेपूची सोमवारी 24 हजार 700, तर मंगळवारी 38 हजार 800 आवक झाली. त्यामुळे दर किमान पन्नास पैसे, कमाल साडेदहा तर सरासरी साडेतीन रुपयांवर घसरला. सोमवारच्या तुलनेत कांदा पातीची आवकही दुपटीहून अधिक म्हणजेच नऊ हजार जुड्या झाली. कमाल दर 36 वरून 26 वर आला. सरासरी दरातही जुडीमागे 10 रुपयांनी घसरण होऊन तो वीसवर आला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here