15 दिवसात उद्यानांची स्थिती सुधारण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

navi-mumbai-abhijeet-bangar

नवी मुंबई (उपसंपादक महेश खेरनार) – नवी मुंबईची ओळख ‘उद्यानांचे शहर’ अशीही असून दरम्यानच्या काळात झालेले उद्यान दूरवस्थेचे चित्र बदलणे हे आपल्यापुढील आव्हान असल्याचे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी उद्यानांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पुढील 15 दिवसांचे अल्टिमेटम देत संपूर्ण क्षमतेने काम करण्याचे निर्देश उद्यान विभागाच्या विशेष बैठकीप्रसंगी दिले.

 

उद्यान विभागातील अधिका-यांची वरची फळी काहीशी बदललेली असली तरी प्रत्यक्ष जागेवर काम करणारे उद्यान सहाय्यक व उद्यानांची देखभाल करणारे कामगार तेच असल्यामुळे उद्यानांचे आजचे स्वरूप बदलून त्यात आमुलाग्र सुधारणा करण्यासाठी पुढील 15 दिवस झोकून देऊन काम करावे असे सांगत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी उद्यानांचे स्वरूप आपल्या नजरेला समाधानकारक वाटेल अशाप्रकारे काम करावे व कामात 15 दिवसानंतर जराही तडजोड खपवून घेतली जाणार नाही आणि जाणूनबुजून हलगर्जीपणा केल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट शब्दात निर्देश दिले.

उद्यान विभागाच्या उपआयुक्तांपासून सर्व अधिका-यांनी दररोज वेगवेगळ्या उद्यानांना, हरितपट्ट्यांना, सुशोभित जागांना भेट देऊन तेथील तेथील सद्यस्थितीची पाहणी करावी व त्यामध्ये सुधारणा करून घ्याव्यात असेही आयुक्तांनी यावेळी आदेशित केले.

उद्यान विषयक कामांमध्ये विशेषत्वाने उद्यानांची दैनंदिन स्वच्छता ठेवणे, नियमित कचरा उचलणे, कम्पोस्ट पीट्स उपयोगात ठेवणे आणि उद्यानांच्या देशभाल दुरूस्तीकडे व्यवस्थित लक्ष देणे तसेच उद्यानांची सुरक्षा राखणे या बाबींबाबत काटेकोर कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या.

अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे यांच्यासह, उद्यान अधिकारी व उद्यान सहाय्यक यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्यान विभागाच्या विशेष बैठकीप्रसंगी आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी विभागाची ओळख काम करणा-या अधिकारी, कर्मचा-यांमुळे होते. त्यामुळे उद्यानांची विशेष काळजी घेत उद्यानांचे स्वरूप बदलण्यासाठी 100 टक्के क्षमतेने काम करावे. काम करताना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून संपूर्ण सहकार्य मिळेल असे स्पष्ट करीत याकरिता 15 दिवसांची मुदत देत त्यानंतर अचानक कोणत्याही उद्यानाला भेट देऊन त्याची पाहणी करणार असल्याचे सांगितले. या भेटीमध्ये कामात कोणत्याही प्रकारे निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसून त्याच ठिकाणी कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट संकेत आयुक्तांनी दिले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here