मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – अभिनेत्री आणि नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर यांचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची घटना १६ डिसेंबर रोजी घडली होती. या पार्श्वभूमीवर उर्मिला मातोंडकर यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला याबाबत तक्रार केली आहे.
उर्मिला मातोंडकर यांनी १६ तारखेला झालेल्या इंस्टाग्राम हॅकिंगबाबत पोलिसांमध्ये तक्रार देखील नोंदवली आहे. मुंबई पोलिसांनी FIR दाखल करून घेत अज्ञाताविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. उर्मिला मातोंडकर यांचं हॅक झालेलं इंस्टाग्राम अकाउंट १७ डिसेंबर रोजी पूर्ववत झालेलं.
याप्रकरणी माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यांअंतर्गत कलम ४३, ६६ आणि ६६ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी उर्मिला मातोंडकर यांचा जबाब देखील नोंदवला आहे. उर्मिला मातोंडकर यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली होती.







