मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – ठाणे, मीराभाईंदर व भिवंडी या तीन महापालिका आणि ठाणे ग्रामीण भागातील गावे यांना स्टेमकडून पाणीपुरवठा होत आहे. मात्र या कंपनीने इतरत्र कुठेही पाणीपुरवठा न करता. तो या शहरांनाच मुबलक प्रमाणात होईल. या दृष्टीने काम करावयाचे आहे. तसे झाल्यास संबंधितांना जबाबदार धरुन कारवाई करण्यात येईल. असा आदेश देत स्टेम प्राधिकरण ही कंपनी म्हणूनच राहिली पाहिजे. अशा सूचना ठाण्याचे महापौर तथा स्टेम वॉटरडिस्ट्री ॲण्ड इन्फा कं. प्रा. लि. चे अध्यक्ष नरेश म्हस्के यांनी सोमवार, दिनांक २१ डिसेंबर रोजी झालेल्या गव्हर्निंग समितीच्या बैठकीत दिल्या.
या मीराभाईंदच्या महापौर ज्योत्सना हसनाळे, ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, भिवंडीचे महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आशिया, मीराभाईंदर महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय राठोड, जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे उपस्थित होते. या बैठकीत सहयोगी संस्था व्यतिरिक्त इतर बाह्य संस्थाना पाणीपुरवठा करणे, स्टेमच्या जागेवर / जलवाहिनीवरुन पोहोच रस्ता बांधणे, स्टेमची जागा खासगी बाह्य संस्थांना भाडेतत्वावर देणे. या विषयावर चर्चा करुन सदर प्रकरणी जी कार्यवाही केली. त्यावर महापौरांनी नाराजी व्यक्त करुन असे प्रकार करणे उचित नसून ते तात्काळ रद्द करण्यात यावे. असे आदेश स्टेम प्राधिकरणाला दिले. जर अन्य कोणाला पाणीपुरवठा केला असल्यास त्याची शहानिशा करुन तो पाणीपुरवठा तात्काळ खंडित करण्यात याव्यात. असेही यावेळी सूचित करण्यात आले. तसेच यापुढे अशा प्रकारे बाह्यसंस्थांना पाणीपुरवठा केल्यास त्याबाबत संबंधितांना जबाबदार धरुन कारवाई केली जाईल. अशीही समज या बैठकीत संबंधितांना दिली.
स्टेम प्राधिकरणाने तिन्ही महापालिकांची परवानगी न घेता सोलार प्रकल्प प्रस्तावित केला होता, या प्रकल्पासाठी परस्पर निविदा प्रक्रिया देखील गव्हर्निंग कमिटीच्या मान्यतेशिवाय कार्यवाही केल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारचा गैरप्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नसल्याचे सांगून हा प्रकल्प रद्द करावा. असे सक्त आदेश महापौरांनी यावेळी दिले.
बदलापूर मधील जांभूळ येथे रॉ वॉटर पंपीग स्टेशन उभारण्याबाबतही स्टेम प्राधिकरणाकडून परस्पर कार्यवाही झाली असून २३६ कोटीचा प्रकल्प विचाराधीन होता. परंतु तो व्यवहार्य नाही असे मत स्टेमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर प्रकल्पाबाबत महापौरांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली असून हा प्रकल्प आवश्यक नसल्याचे मत व्यक्त करत. या प्रकल्पाच्या सल्लागारावर जो खर्च झाला याला जबाबदार कोण ? असा प्रश्न महापौरांनी विचारला. या प्रकल्पास गव्हर्निंग कमिटीच्या मान्यता घेणे अपेक्षित असताना तशी कार्यवाही न केल्याने व या सद्य परिस्थितीत सदर आवश्यकता नसल्याने हा प्रकल्प देखील रद्द करण्यात यावा असेही या बैठकीत ठरविण्यात आले. असे निर्णय या पुढे खपवून घेतले जाणार नाही. असा इशारा स्टेम वॉटरडिस्ट्री ॲण्ड इन्फा कं. प्रा. लि. चे अध्यक्ष व महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी दिला. सध्या स्टेम प्राधिकरणामध्ये कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने कामकाज करताना अनेक अडचणी येत असल्याचे वारंवार सांगण्यात येत होते, त्या अनुषंगाने सदर प्राधिकरणाचा प्रशासकीय कारभार सुरळीत व्हावा. यासाठी पूर्ण वेळ मुख्य कार्यकारी अभियंता, तांत्रिक संचालक, मुख्य वित्त अधिकारी, प्रशासकीय अधिकारी ही रिक्त पदे तातडीने भरण्याचे आदेश महापौरांनी दिले. यापुढे स्टेम प्राधिकरणाचा कारभार पारदर्शक व्हावा व ठाणे, मीराभाईंदर व भिवंडी व भिवंडी ग्रामीण या भागांना मुबलक पाणीपुरवठा होईल. या दृष्टीकोनातून प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत असेही आदेश यावेळी देण्यात आले.
स्टेमकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा खंडीत होत असल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे. विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी आवश्यक असलेली ओव्हरहेड वायर, त्यासाठी आवश्यक असलेली विद्युत साधने तातडीने उपलब्ध कराव्यात तसेच पाण्याच्या नादुरूस्त जलवाहिन्या तातडीने बदलाव्यात या दृष्टीने स्टेम प्राधिकरणाकडून कार्यवाही व्हावी अशाही सूचना या बैठकीत देण्यात आली.







