सातारा (उपसंपादक सत्यजीत माने) – कोरोनाचा फैलाव वाढत असतानाही भारतीय जनता पक्षाचे आमदार राम सातपुते यांच्या शाही लग्नसोहळ्यात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. त्यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारयरल झाले होते. त्यानुसार सातपुतेंच्या लग्न सोहळ्यात नियमांचे पालन झाले की नाही याची चौकशी करण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीवन जगदाळे यांना दिले आहेत.
माळशिरस तालुक्याचे भाजपचे आमदार राम सातपुते यांचा रविवारी शाही लग्नसोहळा संपन्न झाला. लग्नसमारंभात राज्यभरातून आलेल्या विविध नागरिकांसह नेते मंडळींनी सोशल डिस्टन्सचे नियम पायदळी तुडविल्याचे दिसून आले. त्यामुळे इतरवेळी नियमांवर बोट ठेवून महाविकास आघाडी सरकारच्या नावाने बोंबा मारणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी नियमांना तिलांजली का दिली अशी विचारणा नागरिकांनी केली आहे. सर्वसामान्यांना दंड मग राजकीय नेत्यांकडे दुर्लक्ष का असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यापार्श्वभूमीवर संबंधित लग्नसोहळ्यात उपस्थित नागरिकांकडून नियमांचा भंग झाला आहे काय, यासंदर्भात चौकशीचे आदेश दिल्याची माहिती शिसवे यांनी दिली आहे.
लग्नसोहळ्यासाठी 50 नागरिकांना एकत्रित येण्याची परवानगी आहे. मात्र, सातपुतेंच्या लग्नात नियमांपेक्षा अधिक नागरिकांची उपस्थित असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. लग्नसोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, आमदार गोपीचंद पडळकर, प्रशांत परिचारक, नीतेश राणे यांनी हजेरी लावली होती.
लग्नसमारंभ नियमांच्या पालनासंदर्भात चौकशी सुरू आहे. त्यासंदर्भात अलंकार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवन जगदाळे यांच्याकडून तपासणीचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. त्याशिवाय लग्नसमारंभाला विशेष परवानगी होती काय याचीही माहिती स्पष्ट होणार आहे.







