नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे)- नवी मुंबई क्षेत्रामध्ये सिडको भूखंडावरील सर्व सहकारी गृहनिर्माण / प्रिमायसेस संस्थांच्या व्यवस्थापक समितीला सहनिबंधक सहकारी संस्था, सिडको, नवी मुंबई यांचे सहनिबंधक डॉ. केदारी जाधव यांच्या वतीने, महाराष्ट्र सहकारी संस्था, अधिनियम 1960 चे सुधारीत कलम 154 (ब) (27) (1) नुसार, सुका, ओला व घरगुती धोकादायक कचरा स्वतंत्रपणे देणे त्याचप्रमाणे 50 किलोपेक्षा जास्त दैनंदिन कचरा निर्मिती होते अशा संस्थांनी संस्थेच्या आवारातच कम्पोस्ट करणे बंधनकारक असल्याचे निर्देश 22 डिसेंबर 2020 रोजी निर्गमित केलेले आहेत.
केंद्र शासनाकडील अधिसूचना क्र. एस.ओ.1357, दि.08 / 04 / 2016 अन्वये घनकचरा व्यवस्थापन हाताळणी नियम 2016 लागू करण्यात आलेले आहेत. या नियमांतर्गत प्रत्येक कचरा निर्मात्या नागरिकांनी विघटनशील (कुजणारा किंवा ओला) व अविघटनशील (न कुजणारा किंवा सुका) आणि घरगुती धोकादायक असा वर्गीकृत केलेला कचरा स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थेने नेमून दिलेल्या व्यक्तीकडे / एजन्सीकडे देणे बंधनकारक आहे. या नियमाची प्रभावी अंमलबजावणी नवी मुंबई शहरामध्ये सुरु आहे.







