मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – गुजरात मधील सुरतच्या डॉ. प्रफुल्ल शिरोया परिवाराने ३५३ वेळा रक्तदान करून रेकॉर्ड ब्रेक केले आहे.सुरत येथील शिरोया परिवार “रक्त डोनेट परिवार” म्हणून ओळखला जातो. डॉ.प्रफुल्ल शिरोया ( वय ५६ ) कुटुंब प्रमुख असून त्यांनी १९८२ साली मेडिकल कॉलेजला प्रथम वर्षाला असताना पहिले रक्तदान केले होते. तदनंतर हा सिलसिला आज पर्यंत सतत सुरू आहे.
डॉ.प्रफुल्ल यांनी आज १७५ वेळा रक्तदान केले आहे. रक्तदान करण्याची डब्बल सेंचुरी ते लवकरच पूर्ण करणार आहेत.डॉक्टरांच्या पत्नी सौ.अस्मिता वय (५४ ) यांनी लग्नानंतर पतीकडून प्रेरणा घेऊन रक्तदान करण्यास सुरवात केली.आज पर्यंत त्यांनी ९० वेळा रक्तदान केले असून, त्या लवकरच शतक पूर्ण करणार आहेत.तसेच डॉक्टरांची पहिली कन्या डॉ.कोमल देसाई (वय ३०) ( लग्नानंतरचे नाव) यांनी आज पर्यंत ४६ वेळा रक्तदान केले आहे. त्यांचे अर्धशतक लवकरच पूर्ण होईल.डॉक्टरांची दुसरी कन्या डॉ.पिंकल शिरोया ( वय २७) यांनी आज पर्यंत ३४ वेळा रक्तदान केले आहे.तसेचडॉक्टरांचा मुलगा हरिकृष्ण ( वय २३) याने आज पर्यंत २८वेळा रक्तदान केले आहे.
एकाद्या घरात एक वेडा असू शकतो, पण सर्व कुटुंबच वेडे कसे असू शकते? समाजात लोक जळुसारखे दुसऱ्यांच्या रक्ताचे शोषण करीत असतात, असे असतानाही या कुटुंबाने सुमारे १०६ लिटर रक्त दान करून समाजाची एक महत्वपूर्ण सेवा केली आहे. या संपूर्ण कुटुंबाने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून रक्तदानाचे सामाजिक कार्य केले आहे.यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर , लॉकडाऊनच्या काळात रक्ताची गरज असताना जीवाची पर्वा न करता या कुटुंबाने आपले सत्कर्म केले आहे. डॉक्टरांच्या तिन्ही मुलांनी वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर रक्तदान करून आपली सेवा द्यायला सुरवात केली होती. सामाजिक प्रसंगी , संकटकाळी, कठीण प्रसंगी व सण समारंभातही त्यांनी रक्तदान करून आपला वेगळा आत्मिक आनंद घेतला आहे.
विशेषतः डॉ. प्रफुल्ल शिरोया हे दक्षिण गुजरातच्या चक्षुबॅंकेचे प्रमुख असून अंधत्व निवारण सेवाही बजावत आहेत. तसेच डॉ. शिरोया रेडक्रॉस सोसायटीच्या होमगार्डचे मानद कमांडेट या पदावर कार्यरत आहेत. डॉक्टरांच्या पत्नी पुर्वी सुरत महानगरपालिकेच्या महापौर होत्या.संपूर्ण शिरोया कुटुंब समाजाच्या कठीण प्रसंगी धाऊन जाणारे असून सूरतमध्ये लोकांच्या मनामनात त्यांनी आपल्या सेवाभावी सत्कर्मामुळे अढळ स्थान पटकावले आहे.जगातील सर्वांत महान दान म्हणजे रक्तदान आणि हे रक्तदान करणाऱ्यात अखंड भारतातील सर्वांत जास्तवेळा रक्तदान करणाऱ्या या कुटुंबास परमेश्वर आरोग्यदायी दीर्घायुष्य देऊ दे ही ईश्वरचरणी प्रार्थना! विशेषत: अंत:करणपूर्वक देव आहे की नाही माहीत नाही, पण शिरोया कुटुंब मात्र समाजासाठी देवाचेच दुसरे रूप आहे , अशी प्रतिक्रिया संपत गायकवाड (माजी सहाय्यक शिक्षण संचालक) यांनी व्यक्त केली आहे.







