जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे रविवारी (दि.२७) दुपारी साडेतीन वाजता जळगावातून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईला जाण्यापूर्वी ते नाशिकला निकटवर्तीयांच्या लग्नसमारंभाला उपस्थित राहणार आहेत. भोसरीतील भूखंड व्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावल्याने ते बुधवारी मुंबईत चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत.
एकनाथराव खडसे यांना पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील एका भूखंडाच्या व्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने चौकशीची नोटीस बजावली आहे. त्यानुसार नाथाभाऊंना बुधवारी (३०डिसेंबर) मुंबईत ईडीच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. नाथाभाऊ काल शनिवारी सायंकाळी मुक्ताईनगर येथून जळगावात आपल्या मुक्ताई निवासस्थानी आलेले होते. रविवारी दुपारी कुटुंबीयांसह वाहनांनी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईला आपण ३० रोजी पोहचणार आहोत, आधी एका लग्न समारंभाला जात असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. एकनाथराव खडसे यांच्यासोबत पत्नी तथा जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, कन्या ॲड. रोहिणीताई खडसे-खेवलकर देखील आहेत.
भोसरीतील भूखंडाच्या व्यवहार प्रकरणी आपल्याला ईडीने नोटीस बजावली असून, आपण या चौकशीसाठी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार आहोत. आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देऊ, असे खडसेंनी शनिवारीच स्पष्ट केले आहे







