कोरोनाविरोधातील युध्दात सामाजिक संघटनांसह आता जिल्हाधिकारी राऊत स्वतः मैदानात

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – शहरातील कोरोना रुग्णाची संख्या काही केल्या कमी होत नसल्याने शहरात महापालिकेतर्फे रुग्णशोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. या शोध मोहिमेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पाहणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे स्वतः नागरिकांच्या घरी पोहोचले. तपासणी करणाऱ्या पथकाबरोबर जिल्हाधिकारी आपल्या दारी आल्याचे पाहून अनेकांना आश्‍चर्याचा धक्काच बसला.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गिरणा टाकी परिसरातील नवीन पोस्टल कॉलनी परिसरात सर्वेक्षण टीम सोबत सहभागी होऊन पाहणी केली. रुग्णशोध मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन प्रामुख्याने तापमापक यंत्राने ताप मोजणे, ऑक्सिमिटरच्या साहाय्याने ऑक्सिजन पातळी, पल्स रेट मोजणे, तसेच इतर आजार (मधुमेह, क्षयरोग, हृदयरोग) याची नोंद केली जात आहे.
महापालिका व जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील काही सामाजिक संस्था व संघटनांनी ही ‘रुग्णशोध मोहीम’ हाती घेतली आहे. यात संपूर्ण शहरातील प्रभाग निहाय विविध संस्थांची योजना केली आहे. यानुसार त्या त्या प्रभागात अन्य संस्थांप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक देखील या मोहिमेत प्रशासनासोबत सर्वेक्षण करीत आहेत.
एका टीम मध्ये एक महापालिका शिक्षक व दोन स्वयंसेवक असे तीन जण आहेत. या प्रमाणे शहरातील ५० भागांत १०० व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सर्वेक्षण करीत आहेत. प्रत्येक टीम दररोज १०० घरांचे सर्वेक्षण करणार आहे. आरएसएसच्या स्वयंसेवकांच्या सुरक्षेसाठी त्यांना पीपीई कीट, फेसशील्ड, मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहे.

तसेच कोविड सेंटरलाही जिल्हाधिकारी राऊत यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. वैद्यकिय अधिकाऱ्यांशी चर्चा करीत कोविड सेंटरमधील व्यवस्थेविषयी अधिक माहिती घेतली. स्वतः जिल्हाधिकारीच कोरोना विरोधात आता मैदानात उतरल्याने, नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here