कर्नाटक विधान परिषद उपसभापतींची आत्महत्या; रेल्वे रुळावर सापडला मृतदेह

SL-Dharmegowda

कोंडूर (कर्नाटक) – कर्नाटकातील राजकीय वर्तुळाला हादरवून टाकणारी घटना सोमवारी मध्यरात्री समोर आली. कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती एसएल धर्मगौडा यांनी आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे रेल्वे रुळावर त्यांच्या मृतदेह आढळून आला. रात्री दोन वाजता त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना मृतदेह सापडलेल्या ठिकाणी धर्मगौडा यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोटही सापडली आहे.

जेडीएसचे नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती धर्मगौडा यांनी आत्महत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. चिक्कामागलुरू जिल्ह्यातील कादूरजवळील एका रेल्वे रुळावर त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे.

धर्मगौडा यांनी आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक असल्याचं माजी पंतप्रधान व जेडीएसचे नेते एचडी देवगौडा यांनी म्हटलं आहे. “विधान परिषदेचे उपसभापती आणि जेडीएसचे नेते एसएल धर्मगौडा यांच्या आत्महत्येची बातमी ऐकून धक्का बसला आहे. ते एक शांत आणि सभ्य नेते होते. त्यांच्या जाण्याने राज्याचे नुकसान झालं आहे,” अशा शब्दात देवगौडा यांनी शोक व्यक्त केला आहे.

६४ वर्षीय धर्मगौडा हे अलिकडेच चर्चेत आले होते. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं होतं. बेकायदेशीरपणे सभागृहाच कामकाज चालवत असल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदारांनी केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here