मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना भोसरी भूखंड प्रकरणी ईडीने नोटीस बजावली आहे. त्यांना आज म्हणजेच ३० डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहावे लागणार होते. दरम्यान, खडसे यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आलीय. त्यांच्या अहवाल अद्याप आला नसल्याने खडसे ईडीच्या चौकशीला उपस्थित राहणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एकनाथराव खडसे यांना कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत. म्हणून एकनाथराव खडसे यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. मात्र अद्याप चाचणी अहवाल मिळाला नसल्याने त्यांची प्रतीक्षा आहे, अशी माहिती रक्षा खडसे यांनी दिली आहे. तसेच, कोरोनासंदर्भात अहवाल आल्यानंतर खडसे चौकशीला सामोरे जाणार की नाही हे स्पष्ट होणार असल्याचे रक्षा खडसे यांनी म्हटले आहे.
भोसरी औद्योगिक वसाहतीतील भूखंड व्यवहार प्रकरणात ईडीने त्यांना नोटीस बजावली आहे. या चौकशीला उपस्थित राहण्यासाठी खडसे दोन दिवसांपूर्वी जळगावहून मुंबईला दाखल झाले होते. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ खडसे हे त्यांच्या वकीलामार्फत हजर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खडसे हे उद्या स्वतः हजर राहतात की वकिलामार्फत आपली बाजू मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







