लडाख – लडाख मोर्चावर भारत आणि चीन सैन्यात पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. तहाच्या चिंधड्या उडवून हॉट स्प्रिंगवर चिनी सैनिकांचा वावर पुन्हा सुरू झाला आहे. पीपी-15 हे क्षेत्र हॉट स्प्रिंग म्हणून ओळखले जाते. हॉट स्प्रिंगसह पँगाँग सरोवराच्या ठिकाणावरूनही चिनी सैन्याने माघारी फिरण्यास नकार दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार, लडाखच्या या दोन्ही परिसरात दोन्ही सैन्यांमध्ये तणावाचे वातावरण कायम आहे. हॉट स्प्रिंग परिसरातून चीनने आपले सैनिक न हटविल्याने भारतानेही येथे सैन्य तैनात केले आहे. शुक्रवारी सकाळी हॉट स्प्रिंग परिसरातून पेट्रोलिंग पॉईंट 15 वरून चिनी सैन्याने आपले तंबू उखडून टाकलेले होते आणि ते माघारीही फिरले होते; पण शनिवारी सकाळी पुन्हा 50 हून जास्त चिनी सैनिक या भागात दिसलेले आहेत. चिनी सैन्याने शनिवारी तंबू वगैरे ठोकलेले नाहीत किंवा मोर्चाबंदीची कुठली कारवाईही केलेली नाही; पण ते परतल्याने तणावाची स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. परिणामी, भारतीय लष्करानेही आपले जवान या भागात तैनात केले आहेत. हॉट स्प्रिंगवर तेवढेच भारतीय जवान तैनात करण्यात आलेले आहेत, जेवढे चीनने तैनात केलेले आहेत. पँगाँग सरोवराच्या भागातूनही चिनी सैनिक मागे हटलेले नाहीत. तसे संकेतही मिळालेले नाहीत. तह, करार, चर्चा वगैरेत काय ठरले ते काहीही मानायला चिनी सैनिक तयार नाहीत. पँगाँग सरोवर परिसरात चिनी सैनिकांची गस्त सुरूच आहे. ते मोटार बोटींचाही वापर गस्तीसाठी करत आहेत. अधिकारी म्हणत जरूर होते की, चर्चेच्या माध्यमातून विषय मिटविला जाईल. तडजोड होईल; पण तशी चिन्हे प्रत्यक्षात तरी ‘एलएसी’वर दिसत नसल्याची स्थिती आहे.







