कल्याण (नवलकिशोर शर्मा ) – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमधून पळून गेलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा फुटपाथवर तडफडून मृत्यू झाला असून या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
डोंबिवली पश्चिम शास्त्रीनगर रुग्णालयासमोरील काही स्थानिक रहिवाशांनी हा व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये फुटपाथवर कोरोनाबाधित रुग्ण झोपलेला असल्याचे आढळून आले. त्यामुळे स्थानिक रहिवाश्यांनी याबाबत रुग्णालयाला फोन करून माहिती दिली. सदर रुग्ण कुठून आला याबद्दल स्थानिक रहिवाश्यांनी विचारण्याचा प्रयत्नही केला. तथापी त्याची बोलण्याचीही स्थिती नव्हती. अखेर तीन तासानंतर या तरुणाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी या तरुणाला तपासून मृत घोषित केले. याबद्दल केडीएमसीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रुग्ण रुग्णालयातून पळून गेला होता. गुरुवारी रात्री ही घटना घडली होती. हा रुग्ण कुठे पळून गेला याची माहिती मिळू शकली नाही. त्यानंतर स्थानिकांनी हा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर या रुग्णाचा पत्ता लागला.
सदर रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत होता. मात्र आयसीयूमध्ये 2 रुग्णांचा मृत्यू झाला होता. हे दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात रुग्णालय स्टाफ व्यस्त असल्याचा फायदा घेऊन हा रुग्ण पळून गेला. मात्र गर्दीत याची माहिती मिळण्यास उशीर झाला. माहिती मिळताच त्याला पुन्हा उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.







