महानायक अमिताभ यांच्यासह अभिषेक बच्चनला कोरोनाची बाधा

  • अभिनेत्री रेखा यांचा बंगला सिल
  • जया व ऐश्वर्या बच्चन निगेटीव्ह
  • अमिताभ यांचा बंगला करणार सॅनिटाइझ

मुंबई (हितेश मिस्त्री) – शतकाचे महानायक अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांना अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी स्वत:ची वैद्यकीय तपासणी करवून घेतली होती. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून, त्यांनी स्वत:च ट्विटरवरून आपल्याला कोरोना झाला असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, अभिषेक बच्चनचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. अमिताभ यांच्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
यापूर्वीही लीलावती रुग्णालयात ते वरचेवर तपासणी आणि उपचारासाठी जात होते. मध्यंतरी एकदा रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. अमिताभ बच्चन यांना गेल्या काही दिवसांपासून घशाचा आणि मणक्याचा त्रास आहे. वेदना असह्य झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास 4 तास रुग्णालयात दाखल राहिल्यानंतर त्यांना घरी जाण्यास परवानगी देण्यात आली होती. गतवर्षी ‘कौन बनेगा करोडपती’दरम्यान त्यांना गळ्यात त्रास उद्भवला होता. नंतर ते लगेचच ‘लीलावती’त गेले होते. या दुखण्यामुळे ते ‘लीलावती’त अधूनमधून तपासणीसाठी जात असत.
रात्री 10 वाजून 52 मिनिटांनी बच्चन यांनी स्वत: ते बाधित असल्याचे स्पष्ट केले. गेल्या 10 दिवसांत जे जे लोक माझ्या संपर्कात आलेत, त्यांनी स्वत:ची चाचणी कृपया करून घ्यावी, असे कळकळीचे आवाहनही महानायकाने या पोस्टमध्ये केले आहे. बच्चन कुटुंबीयांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत, त्यांचे अहवाल अद्याप यायचे आहेत. दरम्यान, अमिताभ यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे आणि महानायकाने त्वरित बरे व्हावे म्हणून प्रार्थना केली आहे. नानावटी रुग्णालयात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
अभिनेत्री रेखा यांचा बंगला सिल
अभिनेत्री रेखा यांचा बंगला मुंबई महापालिका प्रशासनाकडून सील करण्यात आल्याचे समजते. रेखा यांच्या वांद्रे स्थित सी स्प्रिंग बंगल्याबाहेर दोन सुरक्षा रक्षक तैनात असतात, त्यातील एका सुरत्रा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्याने, पालिका प्रशासनाने हा बंगला प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला आहे. यापूर्वी करण जोहर, बॉनी कपूर आणि आमिर खान यांच्या घरातील स्टाफलाही कोरोनाची लागण झाली होती.
रणबीर, नितू सिंग व करण जोहरही बाधित?
रिध्दिमा कपूर यांनी आयोजित केलेल्या अगस्त्या नंदाच्या बर्थडे पार्टीला अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावली होती. रणबीर कपूर, नितू सिंग, करण जोहर हे ही या पार्टीत सहभागी झाले होते. त्यांनाही कोरोना झाल्याचे वृत्त आहे, याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here