पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – कोरेगाव भीमाजवळ वेळ नदीच्या पलीकडे पेरणेफाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना व अभिवादन दिन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनासह इतर विभाग सज्ज आहेत. यावर्षी प्रतिकात्मक मानवंदना कार्यक्रम असूनही तो यशस्वी करण्यासाठी तब्बल तीन हजारपेक्षा जास्त पोलीस फौजफाटा, आरोग्य पथक, जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून रात्री 12 वाजल्यापासूनच विजयस्तंभास मानवंदना व इतर कार्यक्रमास सुरुवात झाली आहे.
1 जानेवारी 2021 रोजीचे विजयरणस्तंभ अभिवादन कार्यक्रम जरी प्रतिकात्मक असला तरी याठिकाणी बंदोबस्ताचे पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून कडकोट नियोजन करण्यात आलेले आहे. मानवंदना कार्यक्रमासाठी देशभरासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांबरोबरच विदर्भ, नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ या भागातून जास्त प्रमाणात जनसमुदाय येतो. तसेच मुंबई, पिंपरी चिंचवड, भोसरी या भागातून व महाराष्ट्राबाहेरून देखील लोक येत असतात; मात्र यावर्षी मानवंदनेसाठी पास सक्तीचे करण्यात आले असल्याने ज्यांना पास असेल त्यांनाच मानवंदनेसाठी प्रवेश देण्यात येणार असल्याने मानवंदनेसाठी येणाऱ्या अनुयायांनी सहकार्य करण्याचे आवाहन कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी केले आहे.
विजयस्तंभास रात्री 12 वाजता सामूहिक बुद्धवंदना, 12 वाजून एक मिनिटांनी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे. सकाळी सहा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व नितीन राऊत हे विजयस्तंभास मानवंदनेसाठी येणार आहेत. त्यानंतर समता सैनिक दलाच्या 250 जवानांची मानवंदना होणार असून भीमगीतांचे कार्यक्रमही यावेळी होणार आहे. या संपूर्ण मानवंदना कार्यक्रमाचे दूरदर्शनसह इतर माध्यमांबरोबरच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने फेसबुक व यू ट्यूबवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
दरम्यान या अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक वेगळ्या मार्गाने वळविण्यात येणार असल्यामुळे पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
मानवंदना कार्यक्रम करोनाच्या प्रादुर्भावामुळे छोट्या स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे; मात्र तरीदेखील प्रशासनाने नेहमीप्रमाणे योग्य ती खबरदारी घेतलेली असून दरवर्षीप्रमाणे वाहतुकीत बदल केला आहे.तर एक जानेवारी रोजी अहमदनगर बाजूने पुणेच्या दिशेने येणारी सर्व वाहने शिक्रापूर चौकातून चाकण मार्गे, पुणे बाजूने अहमदनगरकडे जाणारी वाहने येरवडा, आळंदीमार्गे चाकण, शिक्रापूर दिशेने तसेच खराडी मार्गे हडपसर, केडगाव चौफुला मार्गे शिरूर दिशेने, नगर बाजूने हडपसरच्या दिशेने येणारी सर्व जड वाहने न्हावरा फाटा तसेच केडगावमार्गे वळविण्यात आलेली आहेत.
आळंदी बाजूने अहमदनगरकडे जाणारी वाहतूक मरकळ, शेलपिंपळगाव मार्गे शिक्रापूर बाजूने वळविण्यात येत आहे, तर एक जानेवारी रोजी नागरिकांनी देखील वाहनांचा वापर न करणे सोयीस्कर राहणार असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







